परभणीहून हिंगोलीला जाणारी बस फलाट क्रमांक एकवर उभी आहे.! हा आवाज घूमला बसस्थानकात...

गमेश पांडे 
Thursday, 20 August 2020

राज्यात गुरुवारी (ता.२०) एसटीने आंतरजिल्हा बससेवाला सुरुवात झाल्यानंतर परभणीचे बसस्थानक परत एकदा प्रवाश्यांनी फुलून गेले होते. परभणीहून दिवसभरात ३५ बसेस धावल्याचे प्रशासनाने सांगितले. 

परभणी ः ‘परभणीहून हिंगोलीला जाणारी बस गाळा क्रमांक एकच्या समोर उभी आहे’. गेल्या कित्येक दिवसांपासून हे वाक्य प्रवाश्यांच्या कानावर पडलेच नव्हते. अखेर गुरुवारी (ता.२०) एसटीने आंतरजिल्हा बससेवाला सुरुवात झाल्यानंतर परभणीचे बसस्थानक परत एकदा प्रवाश्यांनी फुलून गेले होते. 

परभणी विभागांतर्गत सात आगार असून सातही आगारातून बससेवेला शासनाच्या आदेशानंतर गुरुवारी (ता.२०) सकाळपासून सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली एसटीची जिल्हांतर्गत सेवा मागील महिन्यात सुरू करण्यात आली होती. वेळोवेळी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे काही दिवस एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना एसटी पोचत होती. विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून शेजारील जिल्ह्यांत एसटीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी सकाळपासूनच येथील बसस्थानकात चालक, वाहकांसह एसटी बसेसची रेलचेल दिसून आली. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद काहीसा कमीच दिसून आला. मात्र, त्याही परिस्थितीत एसटीने आपली सेवा सुरू केली. परभणी बसस्थानक परिसरात कतीतरी दिवसानंतर औरंगाबाद, बीड, लातूरकडे जाणारी बस उभी असल्याचे अनाउंसमेंट ऐकावयास मिळाले. 

हेही वाचा - ऑटोरिक्षा चालक, मालकांच्या प्रश्नांसाठी ‘वंचित’चे नांदेडला आंदोलन

गुरुवारी दिवसभरात ३५ बसेस सोडल्या 
औरंगाबादसाठी तीन, बीड, लातूरसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे मराठवाड्यातील अन्यही जिल्ह्यांत परभणी विभागातील सर्व आगारातुन बसेस रवाना झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथुन विदर्भातील अकोला येथे बस रवाना झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सिद्धेश्वर दसपुते यांनी दिली. कोरोनामुळे एसटी बसमध्ये २२ प्रवाशीच बसवण्यात येत आहेत. प्रत्येक सीटवर एक यापध्दतीने प्रवाशी बसवल्या जात आहेत. प्रवाशांना मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टंसिंगचे पालनही करावे लागणार आहे. लहान मुले व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या दृष्टीने हायरिस्क असल्याने त्यांना बसमधून प्रवासास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 

हेही वाचा - Video : नांदेडमध्ये आहे जुन्या गाण्यांवर व्यक्त होणारा अंगत-पंगत कार्यक्रम

मागणी असेल तर एसटी बसची व्यवस्था
एखाद्या ठिकाणाहून २०-२२ प्रवाशी जाणार असतील, त्यांची मागणी असेल तर त्यांच्यासाठी एसटी बसची व्यवस्थाही करत त्यांना पाहिजे त्या ठिकाणी नेण्याची व्यवस्थाही करता येईल. - सिध्देश्वर दसपुते, विभागीय वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ 

 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus from Parbhani to Hingoli is parked on platform number one! This sound was heard at the bus stand ..., Parbhani News