esakal | हिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अजूनही ग्रामीण भागातील बस सेवा बंदच असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. कळमनुरी सिरसम,  सालवाडी, कोंढुर, गौळबाजार, जांब, पांगरा, वाकोडी, सालेगाव या गावांमध्ये मुक्कामी राहणाऱ्या बस फेऱ्या बंद आहेत.

हिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत.  याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना दाम दुप्पट भाडे देऊन खाजगी वाहनधारकांची अरेरावी व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाकडून बससेवा बंद करण्यात आली होती. आता ही परिस्थिती पूर्वपदावर येत असून  टप्प्याटप्प्याने  शहरी भागातील व लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ग्रामीण भागातील बस सेवा बंदच असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. कळमनुरी सिरसम,  सालवाडी, कोंढुर, गौळबाजार, जांब, पांगरा, वाकोडी, सालेगाव या गावांमध्ये मुक्कामी राहणाऱ्या बस फेऱ्या बंद आहेत.

हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात सर्वांच्या प्रयत्नातून कोरोनाची रुग्ण संख्या घटली

तसेच  सालेगाव सांडस मार्गे औंढा मार्गावर चालणाऱ्या एकूण १२ बस गाड्यांच्या माध्यमातून  नियमितपणे होणाऱ्या १४३ बसफेऱ्या बंद पडल्या आहेत. ग्रामीण भागात या बस फेऱ्यांच्या माध्यमातून जवळपास दररोज ३०३८ किलोमीटरचा पल्ला पूर्ण होत असे. सोबतच ग्रामीण भागातील या मार्गावर प्रवासी व शाळेच्या विद्यार्थ्यांचे येणे जाणे महामंडळाच्या बसवरच अवलंबून होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने त्याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर होत आहे. 

बससेवा बंद असली तरी ग्रामस्थांना कामकाजानिमित्त शहरी भागात येणे-जाणे करावे लागत असल्याने खासगी प्रवासी वाहनांचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे खाजगी वाहनधारकांनी ग्रामीण भागामध्ये आपल्या वाहनांच्या प्रवासी फेऱ्या ठरवून घेत प्रवास रूट तयार केला आहे.

येथे क्लिक कराच - हिंगोली : पाणी पुरवठा स्वच्छता कक्षातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

प्रवासाची पर्यायी व्यवस्था नसल्याचे लक्षात घेता या खाजगी वाहनधारकांनी ठरवून प्रवासी भाड्यामध्ये दाम दुप्पट वाढ केली आहे. परिणामी प्रवाशांना खाजगी वाहन धारकांची अरेरावी सहन करीत प्रवासाकरीता दाम दुप्पट भाडे मोजावे लागत आहे.  शासनाने शहरी भागात व लांब पल्ल्याच्या बस गाड्यांना नियमांच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय पाहता ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे.

कळमनुरी आगारामधून पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, अकोला या मार्गावर २५ शेड्युल सुरू आहेत.  ५६ फेऱ्यांच्या माध्यमातून ३० बस गाड्या या मार्गावर धावत आहेत. ग्रामीण भागामधील बससेवा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलेही आदेश प्राप्त नाहीत.
- अभिजित बोरीकर, आगार प्रमुख कळमनुरी

संपादन ः प्रमोद चौधरी