गायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. फिरस्ती कुटुंब लहान मुलांना उंटावरून चक्कर मारून उदरनिर्वाह करतात.
 

सोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (ता. सोनपेठ) येथे घडली. 

 शेळगाव (ता. सोनपेठ) येथे काही फिरस्ती कुटुंब आपले उंट घेऊन आले आहेत. हे कुटुंब लहान मुलांना उंटावरून चक्कर मारून मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करत असतात. लोकांना उंटावरून फिरवण्याचा व्यवसाय संपल्यानंतर हे कुटुंब उंटांना चरण्यासाठी गावातीलच गायरानात सोडतात. हे उंट गायरानात फिरत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्‍भवतात. असाच प्रसंग शनिवारी (ता. सात) शेळगाव येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

घनसावंगी (जि. जालना) येथून आपल्या उंटांसह शेळगाव येथे आलेल्या एका कुटुंबाचा एक पूर्ण वाढ झालेला उंट गायरानात चरण्यासाठी गेला असता हरसिंग तांड्यावरील कांचन भोसले व अनंता शिंदे या दोघांनी उंटास कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. या जखमांमुळे अतिरक्तस्राव झाल्याने उंटाचा  सायंकाळी मृत्यू झाला.

 दरम्यान, रविवारी (ता. आठ) उंटाचे मालक गुलाब सय्यद यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरील दोन्ही आरोपी फरार झाले असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर गव्हारे हे करीत आहेत. 

हेही वाचा...

फसवणूक झालेल्या बारा हजार गुंतवणूकदारांचे अर्ज

परभणी : गुंतवणूक दामदुप्पट करण्यासोबतच गुंतवणूक केलेल्या रकमेच्या किंमती एवढे प्लॉट खुल्या जागा देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना गरिमा रिअल इस्टेट अलाईड, गरिमा होम्स हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्हावासीयांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. कंपनीच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तब्बल १२ हजार गुंतवणूकदारांनी अर्ज केले असून, या गुंतवणूकदारांची जवळपास दहा कोटींच्या वर फसवणूक झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रार
गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट करण्यासोबतच त्या किंमती एवढे प्लॉट खुल्या जागा देण्याचे आश्वासन देऊन कंपनीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मुदत संपल्यानंतर परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदर कंपनीविरोधात बोरी, नवा मोंढा, पूर्णा आदी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. फसवणूक झालेल्यांनी आवश्यक कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत बारा हजार गुंतवणूकदारांचे अर्ज आले असून, त्यांची जवळपास दहा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ता. २० डिसेंबरपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन फौजदार जी. बी. दळवी यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Camels killed in pasture in Guarana !