पंकजा मुंडेंविरोधातील क्लिपमुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

विडा (ता. केज) येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐकायला येतात.

परळी : येथील भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात शनिवारी (ता. 19) रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

विडा (ता. केज) येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐकायला येतात. धनंजय मुंडे विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करत भाजप समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.  

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नये असेही मुंडे यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against Dhananjay Munde for video clip viral on Pankaja Munde