esakal | पुजा आव्हाडच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

A case has been registered against five members of his father-in-law in connection with the death of Puja Awhad

माहेराहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी सासरच्या सततच्या होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पुजा आव्हाड हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची तक्रार पुजाचा भाऊ राजू नारायण नवघरे (रा. साडेगाव ता. जि. परभणी) यांनी पोलिस ठाण्यात दिली.

पुजा आव्हाडच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी) : औंढा रोडवरील रसिका हॉटेल मागील शेतात वास्तव्यास असलेल्या आव्हाड कुटुंबातील पुजा आव्हाड या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१३) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी संध्याकाळी तीच्या पतीसह सासरकडील पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेराहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी सासरच्या सततच्या होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पुजा आव्हाड हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची तक्रार पुजाचा भाऊ राजू नारायण नवघरे (रा. साडेगाव ता. जि. परभणी) यांनी पोलिस ठाण्यात दिली. नऊ वर्षापूर्वी पुजा हिचा येथील आसाराम आव्हाड सोबत विवाह झाला. दोन वर्षे या दांपत्याचे वैवाहिक जीवन आनंदात गेले. दरम्यान त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यावेळी सासरकडील मंडळीच्या इच्छेनुसार पुजाच्या भावाने तीची बोळवण केली. तरीही छोट्या मोठ्या कारणावरून तीला त्रास देण्यात येत असे. दरम्यान २०१६ मध्ये पुजाचा नवरा आसाराम आव्हाड याने शेतात विहीर खोदण्यासाठी तिला माहेराहून दोन लाख घेऊन येण्याची मागणी करत तिला सतत शिवीगाळ करून मारहाण करू लागला. 

याबाबत पुजाने भाऊ राजू यास सांगितले असता त्याने त्याचे मामा शंकर आव्हाड यांचेकडून दोन लाख रुपये घेऊन ते दोघांनी आसाराम यास नेऊन दिले. व यापुढे पुजाला त्रास देऊ नये अशी विनंती केली. यावेळी पुजाचे सासरे, सासू, दीर उपस्थित होते. त्यानंतरसुध्दा सासू वेळेवर जेवण देत नसे किंवा थोड्याशा गोष्टीवरून माझ्या बहिणीला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरूच होता, अशाप्रकारे पैशाच्या मागणीवरून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून पुजाने विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या केली असल्याचेे राजू याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी पुजाचा नवरा आसाराम आव्हाड, सासरे बाबाराव आव्हाड, सासू सुमनबाई, दीर अनिल व नणंद राणी घोडके यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

loading image