मध्यवर्ती बॅंकेच्या चोरीस गेलेल्या 23 लाखांचा शोध लागेना- सेलू पोलिसांसमोर आव्हान 

विलास शिंदे
Monday, 5 October 2020

या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.मात्र चोरीस गेलेल्या रक्कमेचा दिड वर्षे संपत अाले तरिही ना शोध,ना गुन्हेगारांना पकडण्यात सेलू पोलीसांना ना यश आले

सेलू ( जिल्हा परभणी )  : तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत,ग्रामीण शाखा, डासाळा व कुपटा येथील कर्मचाऱ्यांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करीत रोख रक्कम तेविस लाख लंपास केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.मात्र चोरीस गेलेल्या रक्कमेचा दिड वर्षे संपत अाले तरिही ना शोध,ना गुन्हेगारांना पकडण्यात सेलू पोलीसांना ना यश आले. पर्यायी हा तपास रेंगाळला आहे.

वर्दळीच्या सेलू ते वालूर या रस्त्यावर ( ता.०७)  सप्टेंबर रोजी राजवाडी जवळ भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  कुपटा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी सचिन ठोके व वालूर बँकेचे शाखाधिकारी प्रदिप डफुरे हे एकाच दुचाकीने बँकेत जात असतांना अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना बेदम मारहाण करून बँगेतील बँकेची रोख रक्कम एक लाख घेऊन चोरांट्यांनी पोबारा केला.श्री.ठोके यांच्या फिर्यादीवरुन सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आहे.मात्र या प्रकरणात पोलिसांना अद्यापही यश मिळाले नाही.मागील दिड वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर दोन शाखेतही अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली रक्कम व चोरांचा शोध पोलिसांना अद्यापही लागला नाही.(ता.२ ) फेब्रुवारी —२०१९ रोजी पाथरी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखा, सेलू येथे मध्यरात्री चोरट्यांनी तीजोरी फोडून एकोणीस लाख 80 हजार रोकड चोरली होती.

हेही वाचा - परभणी : हाथरस प्रकरणी कॉंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग -

बँकेची रक्कम एक लाख 50 हजार लंपास

या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.( ता.२३)  डिसेंबर— २०१९ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा डासाळा येथे दुचाकीने शाखाधिकारी व रोखपाल जात असतांना यांना अज्ञात चोरट्यांनी त्यांना देऊळगाव (गात) पाटी दरम्यान आडवून बेदम मारहान करून त्यांचे जवळील बँकेची रक्कम एक लाख 50 हजार लंपास केली.या प्रकरणीही गुन्हा दाखल झालेला आहे.त्यानंतर डासाळा याच शाखेत ( ता.२०) मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून साठ हजार रूपये चोरले होते.याप्रकरणी ही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सेलूकरांसाठी आत्मचिंतेची बाब ठरू लागली

दिड वर्षाच्या काळात मध्यवर्ती बँकेच्या तिन शाखेतील जवळपास बावीस लाख नव्वद हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे सांस्कृतिक ठेवा असलेल्या या शहरात भरदिवसा चोरी करणार्‍या गुन्हेगारांचा सेलू पोलिसांना मात्र अद्यापही शोध लागेना ही सेलूकरांसाठी आत्मचिंतेची बाब ठरू लागली आहे. या संदर्भात सेलू पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आसता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central bank's Rs 23 lakh stolen has not been traced - a challenge to the Cellu police parbhani news