'साहब, किसान बहोत मुश्‍किल मे है'

कडेगाव (ता. बदनापूर) : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी करताना केंद्रीय पथक. 
कडेगाव (ता. बदनापूर) : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी करताना केंद्रीय पथक. 

बदनापूर -  "साहब, किसान बहोत मुश्‍किल मे है, यंदा पावसाळ्यात तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्हाने कोमेजून गेली, आता अतिवृष्टीत पिके सडली आहेत. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पिकांवर केलेल्या खर्चालाही परवडणारी नाही, त्यामुळे केंद्राने आता आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी आर्त मागणी कडेगाव (जि. जालना) येथे पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडे रविवारी (ता. 24) शेतकऱ्यांनी केली. 

पथकातील डॉ. व्ही. तिरुपुगल व डॉ. के. मनोहरन यांनी शेतकऱ्यांशी हिंदीतून संवाद साधून पिकांवर झालेला खर्च, अपेक्षित उत्पन्न व अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मंडळ अधिकारी एम. एन. काळकुंभे, तलाठी एम. एम. अंभोरे आदींची उपस्थिती होती.

पथकाने विचारले प्रश्न
पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून पेरणी कधी केली होती? कोणती पिके घेतली होती? पावसाचे प्रमाण कसे होते? पिकांचा विमा उतरविला होता का? अतिवृष्टीपूर्वी पिकांची काढणी केली होती का? कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले? पीकविमा मंजूर झाला का? आदी प्रश्न विचारले.

दाटून आला कंठ 
 महिला शेतकरी संगीता रमेश कान्हेरे यांचा अतिवृष्टीत सडलेला सोयाबीन पथकाला दाखविताना कंठ दाटून आला होता. त्यांनी सांगितले, की साहेब, आम्ही तीन वर्षांपासून दुष्काळाचा सातत्याने सामना करतोय. यंदा उधार-उसनवारी करून तुरळक पावसावर खरीप पेरणी केली; मात्र पुन्हा पाऊस रुसल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यात मका, बाजरी पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवला. सोयाबीन पाण्याअभावी सुकल्याने बाजार गेवराई व कडेगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी त्यावर वरवंटा फिरवला. उरलेल्या सोयाबीन पिकावर अतिवृष्टीचा कहर बरसला. त्यात सोयाबीनचे दाणे किडले, सडले. शेतकऱ्यांची दरोमदार कापसावर उरलेली असताना त्यावरही अवकाळी पावसाने घाला घातला. त्यामुळे रब्बीची पेरणी करण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक नाहीत, अशी भीषण वास्तविकता मांडली. 

केंद्राकडून तत्काळ मदतीची अपेक्षा
शेतकरी रामेश्वर लहाने यांनी लष्करी अळी व अतिवृष्टीत मकाच्या कणसांची झालेली अवस्था दाखवली. गणेश लहाने आणि रामराव काळे यांनी अतिवृष्टीत कापसाची बोंडे काळी पडल्याने उत्पादन कमालीचे घटल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी सरपंच भीमराव जाधव, दत्तू पाटील निंबाळकर, रामदास बारगाजे, हरिश्‍चंद्र शिंदे, गणेश कोल्हे, अनिलराव कोलते या शेतकऱ्यांनी दुष्काळ व अतिवृष्टीत पिकांचे झालेले नुकसान, राज्यपालांच्या माध्यमातून मिळालेली तुटपुंजी मदत, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली अवहेलना आणि केंद्राकडून खरीप पिकांसाठी हेक्‍टरी पन्नास हजार रुपये व फळबागांसाठी हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला कापसासाठी खत-बियाणे खरेदी, पेरणी, औषध फवारणी असा हेक्‍टरी 25 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला; मात्र आम्हाला 8 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. त्यात आम्ही केलेला खर्चही भागत नाही. रब्बीच्या पेरणीसाठी आणि पुढे आठ महिने उदरनिर्वाह चालविण्यासाठी पैसा कोठून आणावा? असा प्रश्न पडला आहे. किमान केंद्राने तरी पाहणी, पंचनाम्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करावी, अशी आर्जवी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली. 

कडेगावात 835 हेक्‍टरवर नुकसान 
तालुक्‍यातील बाजार गेवराई, कडेगाव व वरुडी शिवारात संपूर्ण पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुडघाभर वाढीची पिके ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर व हाताने उपटून बांधावर टाकली होती. कडेगाव या एकाच गावात कापूस, सोयाबीन, बाजरी, मका अशा 1 हजार 257 शेतकऱ्यांच्या 835 हेक्‍टरवरील पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे, असा अहवाल केंद्रीय पथकाकडे मांडण्यात आला. 

पथकाच्या ठिकठिकाणी भेटी 
जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफराबाद आणि भोकरदन या तालुक्‍यातील गावांमधील पीकस्थितीची पाहणी करण्यात आली. कडेगावशिवाय भोकरदन तालुक्‍यातील चांधई एक्को, पळसखेडा, जाफराबाद तालुक्‍यातील अकोलादेव येथे पीकपाहणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com