मागील २९ दिवसांत असे बदलत गेले महाराष्ट्राचे राजकारण

विकास देशमुख
Saturday, 23 November 2019

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा गौरव केला होता. आज त्याच राष्ट्रवादीमध्ये फूट पाहायला मिळाली. हे कसे झाले, मागील महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडल्या, याबाबत eSakal.com ने घेतलेला हा आढावा.

औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा गौरव केला होता. आज त्याच राष्ट्रवादीमध्ये फूट पाहायला मिळाली. हे कसे झाले, मागील महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडल्या, याबाबत eSakal.com ने घेतलेला हा आढावा.

निकालनंतर युतीत खडा 
निवडणुकीपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस एकत्र येतील, असा विचारही कुणी केला नव्हता. निवडणूक निकालानंतर मात्र या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्ता स्थापन करणार असल्याचे काल (२२ नोव्हेंबरला) जाहीर केले. आज महाविकास आघाडी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावाही करणार होती. पण, त्या पूर्वीच भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

...आणि युतीचे बिनसले

राज्यात झालेल्या भाजप-शिवसेना यांनी युती तर काॅंग्रेस-राष्ट्रवादीने महाआघाडी करून  विधानसभा निवडणूक लढवली. २४ आॅक्टोबरला निवडणूक निकाल लागला.  यात १०५ जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ तर काॅंग्रेसने ४४ जागा जिकंण्यात यश मिळवले. निकाल लागला तेव्हा शिवसेना-भाजपचे युती सरकार आता पुन्हा येईल, असेच चित्र होते. मात्र, अचानक अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यात आता शिवसेनेने भाजपवर समान वाटपावरून टीका करण्यास सुरवात केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला फायदा 

 'गरज सरो, वैद्य मरो'चा दुसरा अंक सुरू झाला आहे, असा टोला शिवसेनेने निकाल्याच पाच दिवसांनंतर भाजपला लगावला. त्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असे काही ठरलेच नव्हते, असे स्पष्टिकरण देत मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असे भाजपने निक्षुण सांगितले. त्यामुळे युतीत खडा पडला. याचाच फायदा राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला.

काॅंग्रेससोबत जवळीकता वाढवली

शिवसेनेनेही राष्ट्रावादी काॅंग्रेससोबत जवळीकता वाढवली होती. त्यातच ९ नोव्हेंबरला राज्यपलांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दोन दिवसांची मुदत दिली. ११ नोव्हेंबरला शिवसेनेला आणि नंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले. पण, कुणीच बहुमत सिद्ध न करू  शकल्याने १२ नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changing politics of Maharashtra