जन्मदात्यानेच केला मुलाचा खून, पिंपरखेड खून प्रकरणाला वेगळे वळण  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

‘पोलिसी खाक्या’ दाखवताच जन्मदात्या मुलाचा बापच खुनी निघाला असून रक्ताने माखलेले कपडे व ज्या शस्त्राने खून केला ती कुऱ्हाड पोलिसांनी जप्त करून आरोपी बापाला अटक केली आहे.

कडा (जि. बीड) - आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी (ता.२२) मध्यरात्री रामदास चव्हाण या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मंगळवारी (ता.२३) सकाळी उघडकीस आली. नेमका खून का व कशासाठी केला गेला, याचा तपास अंभोरा पोलिस करत असताना बुधवारी (ता.२४) या घटनेला वेगळेच वळण लागले. ‘पोलिसी खाक्या’ दाखवताच जन्मदात्या मुलाचा बापच खुनी निघाला असून रक्ताने माखलेले कपडे व ज्या शस्त्राने खून केला ती कुऱ्हाड पोलिसांनी जप्त करून आरोपी बापाला अटक केली आहे.

मृतावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अंभोरा पोलिसांनी मृताची पत्नी स्वाती चव्हाण यांना फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यांच्यासोबत मृताचे वडील पांडुरंग चव्हाण हेही आले होते. यावेळी कुकलारे यांनी मृत मुलाविषयी अधिक चौकशी केली असता या प्रकरणात ‘दाल में कुछ काला हैं’ असे जाणवले. बुधवारी (ता. २४) ज्ञानेश्वर कुकलारे यांनी संशयित आरोपी पांडुरंग चव्हाण यांना ‘खाक्या’ दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. सदरील मृत रामदास चव्हाण (वय ३५) हा दारू पिऊन घरात पत्नी, आई, वडील यांना नेहमी त्रास द्यायचा. या रोजच्या कटकटीला वैतागून मंगळवारी बापानेच मुलाच्या गळा आणि तोंडावर धारदार कुऱ्हाडीने वार करून खून केला असल्याचे कबूल केले. अंभोरा पोलिसांनी बारा तासांच्या आत या गंभीर गुन्ह्याचा तपास लावला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child murder, a different twist to the Pimparkhed murder case