मिरचीचे भाव घसरल्याने भोकरदनला शेतकरी चिंताग्रस्त 

दीपक सोळंके
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

भोकरदन - मिरची हब म्हणून ओळख असलेल्या भोकरदन तालुक्‍यात लाल ओल्या मिरचीचे ठोक भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतीवर झालेला खर्च निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे व्यापारीदेखील धास्तावले आहेत. 

भोकरदन - मिरची हब म्हणून ओळख असलेल्या भोकरदन तालुक्‍यात लाल ओल्या मिरचीचे ठोक भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतीवर झालेला खर्च निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे व्यापारीदेखील धास्तावले आहेत. 

तालुक्‍यात ठिकठिकाणी खासगी व्यापाऱ्यांची मिरची खरेदी केंद्रे आहेत. त्यामुळे मिरचीची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. हिरव्या मिरचीबरोबर लाल ओली मिरचीच्या धंद्यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तालुक्‍यातील या मिरचीला नागपूर तसेच मध्य प्रदेशातही मोठी मागणी असल्याची माहिती व्यापारी नाजीम शाह यांनी दिली. शिवाय लाल मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनादेखील आर्थिक बळ मिळत आहे.

हेही वाचा : वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्लाबोल

धुके पडत असल्याने  मिरचीला डाग
मागील आठवड्यापासून तालुक्‍यात ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवाय दाट धुके पडत असल्याने ओल्या लाल मिरचीला डाग पडून वाळत घातलेली मिरची जागेवर खराब होत आहे. परिणामी भावात मोठी घसरण झाली असून, व्यापारीदेखील खरेदी करण्यास धजावत नाहीत किंवा पडून भावाने मागत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

ढगाळ वातावरणामुळे व्यापाऱ्यांची घालमेल 
नोव्हेंबरपासून लाल डाडर मिरची खरेदीला सुरवात होते. ही मिरची खरेदी करून व्यापारी मोकळ्या जागेत वाळवल्यानंतर या मिरचीची चांगली, मध्यम व खराब अशा तीन प्रतीत ही मिरची वेगळी केली जाते. सुकण्यासाठी ठेवलेल्या मिरचीमध्ये व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची गुंतवणूक झालेली असते. अशात अवकाळी पावसाने ही मिरची ओली झाली तर व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. म्हणून बदलत्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. 

गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण व धुके पडत असल्याने खरेदी केलेली लाल मिरची वाळणे तर दूरच पण ओलाव्यामुळे ती जागेवर खराब होत आहे. यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यास लाखो रुपयांचे नुकसान होईल. 
- वसीम पठाण, व्यापारी, भोकरदन 

बाजारात हिरव्या मिरचीला केवळ 10 ते 12 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तोडीसाठी 6 रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत असून, बारदाना व बाजारात नेण्याचा खर्च वजा केल्यास हाती काहीच उरत नाही. ढगाळ वातावरणामुळे मिरची झाडाला पिवळी पडत असल्याने लावलेला खर्च निघतो की नाही, हा प्रश्न सतावत आहे. 
- सुरेश नामदे, शेतकरी, प्रल्हादपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chilli rate reduced in Bhokardan