बाबांनो कुटुंबासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, अभिमन्यू पवारांनी साधला लोकांशी फोनवर संवाद

Abhimanyu Pawar, Ausa News
Abhimanyu Pawar, Ausa News
Updated on

औसा (जि.लातूर) : बाबांनो सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा, तुम्ही देशासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे घटक आहात. स्वतः बरोबरच इतरांच्या जीवासाठी कृपया घराबाहेर पडू नका, कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आता सावध नाही झालो तर निसर्ग पुन्हा सावध होण्याची संधी देणार नाही, दारावर आलेल्या या काळाला दारातूनच परत पाठवा' असे आवाहन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी रविवारी (ता.२९) मतदारसंघातील लोकांशी फोनवर संवाद साधतांना केले.


श्री.पवार यांनी मतदारसंघात अडचणी असतील तर सांगा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपर्क कार्यालय बंद केले असून मी आणि माझे कार्यकर्ते तुमच्या सोबतच आहोत. मात्र तुम्ही घराबाहेर विनाकारण पडू नका, तुमचे जगणे देशासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वपूर्ण आहे याची कल्पना तुम्हाला नाही. कोरोना विषाणूच्या रूपाने काळ आपल्या दारापर्यंत आलेला आहे. त्याला घरात प्रवेश करू द्यायचा नसेल तर तुम्ही घरात बसा. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्यासमोर फोनवर त्या मांडा मी त्या तात्काळ सोडविण्यासाठी तयार आहे. शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी आपल्यासाठी रात्रंदिवस झटत आहोत. त्या बदल्यात आम्हाला फक्त तुमच्याकडून संयमाची आणि घरी बसण्याची अपेक्षा आहे. आपले घरात बसने हे देशहितासाठी व आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी हितकारक असून येणाऱ्या आठ ते दहा दिवसांत संक्रमण झपाट्याने वाढणार असल्याने कृपा करून आपली व आपल्या कुटुंबाबरोबरच देशाची काळजी करा आणि घरातच बसा अशी कळकळीची विनंती त्यांनी फोनवर केली.


ट्विटरवरून मदत मागितली, पोलिस तातडीने धावून गेले
लातूर : संचारबंदीमुळे शहरात सगळीकडे शुकशुकाट आहे. सर्व हॉटेल बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मग रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सासऱ्यापर्यंत जेवणाचा डबा पोचवायचा कसा, असा प्रश्न एका महिलेला पडला. अशा स्थितीत जेवणाची सोय कोठे होईल, असा प्रश्न विचारणारे ट्विट ‘त्या’ महिलेने लातूर पोलिसांना केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत लातूर पोलिसांनी त्यांना उत्तर देत ‘पुढील अर्ध्या तासात आम्ही जेवणाचा डबा पोचवू. तुम्ही घरात निश्चिंत राहा’, असे ट्विट केले आणि अर्ध्या तासाच्या आत डबा पोचलाही. त्यामुळे रुग्णाच्या अन्‌ त्याच्या नातेवाइकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आणि खाकी वर्दीतील माणुसकीही अनेकांनी अनुभवली.


संचारबंदीच्या काळात पोलिस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहेत. नागरिक घराबाहेर येऊ नयेत म्हणून दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी अनेकांच्या सुट्यासुद्धा रद्द झाल्या आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलिस सेवा बजावत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांना नागरिकांकडून होणाऱ्या टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा पोलिस रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. इतकेच नव्हे, तर गरजू रुग्ण, बेघर नागरिक, अडकून राहिलेले विद्यार्थी-मजूर यांच्यापर्यंत सामाजिक संस्थांच्या मदतीने जेवणाचा डबा पोचवण्याचे कामही करत आहेत.


विंद्रा बिरादार यांच्या सासऱ्यांना सनराईज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, संचारबंदीमुळे त्यांच्यापर्यंत जेवणाचा डबा पोचवण्यात अडचणी येत असल्याने बिरादार यांनी लातूर पोलिसांना ट्विट केले. त्याची दखल घेत पोलिसांनी बिरादार यांचे रुग्णालयात दाखल असलेले सासरे आणि त्यांच्या नातेवाइकांपर्यंत तातडीने डबा पोचवला. डबा मिळाल्यानंतर बिरादार यांनी आवर्जून पोलिसांचे आभार मानणारे ट्विट केले. संचारबंदीमुळे आपापल्या खोल्यांमध्ये अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांनीही पोलिसांकडे जेवणाच्या डब्यांची मदत मागितली आहे. त्यांच्यापर्यंतही पोलिस डबे पोचवत आहेत. डबा देताना ‘घराबाहेर अजिबात पडू नका’ असा सल्लाही पोलिसांकडून विद्यार्थ्यांना दिला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com