कळमनुरीत अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम नागरिकांनी पाडले बंद

Citizens have stopped the construction of an unauthorized mobile tower in Kalamanuri
Citizens have stopped the construction of an unauthorized mobile tower in Kalamanuri

कळमनुरी (हिंगोली ) : शहरातील गजानन नगर भागात नागरिकांनी थांबवलेल्या अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने परत सुरू केले होते. मात्र नागरिकांनी एकत्र येऊन ते बंद पाडले आहे.

शहरातील गजानन नगर भागात एका नागरिकाने संबंधित मोबाईल कंपनीशी करार करून आपल्या मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर उभारणीचे काम हाती घेतले आहे. ही जागा वसाहतीच्या मध्यभागी असल्यामुळे मोबाईल टॉवरमुळे या वसाहतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचे सांगत सदरील मोबाईल टॉवर उभारणी करीता कुठलीही प्रशासकीय परवानगी न घेता अनधिकृतपणे टॉवर उभारला जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

मोबाईल टॉवर उभारणीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी, यांच्याकडे रितसर तक्रारी करून मोबाईल टॉवर उभारणीचे सुरू असलेले बांधकाम थांबवले होते. मात्र काही दिवस उलटल्यानंतर मोबाईल टॉवर उभारणीचे काम घेतलेल्या कंत्राटदार व जागा मालकांनी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस पाहून याठिकाणी टॉवर उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य आणून टाकत परत एकदा टॉवर उभारण्याचे बांधकाम हाती घेतले.

हा प्रकार या भागातील नागरिकांना माहित होताच सर्व नागरिक शनिवार रात्री एकत्र आले. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला मोबाईल टॉवर उभारण्यास मज्जाव करून मोबाइल टॉवर उभारणी करीता आवश्यक असणाऱ्या परवानगीची कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. हातात कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे संतप्त नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कंत्राटदार व जागा मालकाची त्रेधातिरपीट उडाली.

अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता जमलेल्या नागरिकांनी रात्रीलाच पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्याकडे अर्ज देऊन वसाहतीत अनधिकृतपणे उभा राहत असलेल्या टॉवरचे बांधकाम थांबवण्याची मागणी केली. घटनास्थळी पोलिसही पोहोचले संतप्त नागरिकांचा रोष पाहता मोबाईल टॉवर उभारणीचे काम करणारा कंत्राटदार व त्यांच्या मजुरांनी टॉवर उभारणी करीता आणलेले साहित्य जागेवर सोडून या ठिकाणावरून काढता पाय घेतला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com