गुणवंतांना प्रोत्साहनासाठी घडविली विमान सफर

- अभिजित हिरप
रविवार, 22 जानेवारी 2017

औरंगाबाद - मुलगा मोठा प्रशासकीय अधिकारी व्हावा, असे स्वप्न स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांनी पाहिले; मात्र काही कारणास्तव ते वास्तवात उतरले नाही. ही खंत मुलाच्या मनात सतत सलत होती. नाही जमले तर हरकत नाही; पण इतरांना मदत करून वडिलांची स्वप्नपूर्ती करूया, असा विचार मुलाने केला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांतून प्रोत्साहनाचा प्रयत्न सुरू केला. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना त्यांनी चक्क विमानप्रवासाचीही अनुभूती दिली. वडिलांचे निवृत्तिवेतन आणि पदरमोड करून ते हे सारे करीत आहेत. हा ‘मुलगा’ सध्या निवृत्त असून, वयाच्या साठीत आहे!

साहेबराव अंभोरे असे या उपक्रमशील व्यक्तीचे नाव. त्यांचे महालपिंप्री हे मूळ गाव. सध्या येथील सुदर्शननगरात (हडको) त्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे वडील बाबूराव हे स्वातंत्र्यसैनिक होते. साहेबरावांनी मोठा प्रशासकीय अधिकारी व्हावे, असे स्वप्न बाबूराव यांनी पाहिले. काही कारणास्तव ते पूर्ण होऊ न शकल्याने साहेबरावांच्या मनात खंत होती. एका बॅंकेचे शाखाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना साहेबरावांनी वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा. त्यासाठी वडिलांचे मिळणारे स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन खर्च करण्याचे ठरविले आणि प्रसंगी पदरमोडही. गेल्या पंधरा वर्षांत जिल्हा परिषदेच्या महालपिंप्री (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील प्रशालेतील तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना त्यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण केले. तेही मान्यवरांच्या हस्ते. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. यानिमित्त भेटणाऱ्या वेगवेगळ्या दिग्गजांशी हितगूज झाल्याने काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पहताहेत. वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त चार जानेवारी २०१६ ला साहेबरावांनी या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शाळेसाठी वॉटर फिल्टर दिले. या शाळेतील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवास घडवून आणण्याची घोषणा त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये केली.

त्याप्रमाणे त्यांनी २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना विमानाने मुंबईला नेले. त्यांना मुंबई दर्शन घडविले. मुंबई काय आहे, हे पाहून चौथी ते आठवीचे विद्यार्थी अवाक्‌ झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला आणखी बळकटी मिळाली. आम्ही काहीही करून भविष्यातील अधिकारी होणारच, हे ध्येय उराशी बाळगून वाटचाल करणार असल्याचे मत या विद्यार्थ्यांनी एका सत्कार समारंभात व्यक्त केली. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम झाला होता. साहेबराव २०१४ मध्ये निवृत्त झाले असून, यापुढेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाचा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे ते सांगतात.

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून साहेबराव अंभोरे वेगवेगळे उपक्रम राबवितात. गुणवंत विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून मुंबई दाखविण्याची घोषणा त्यांनी केली आणि घोषणापूर्तीही. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांतील गुणवत्ता वाढीस आपोआपच प्रोत्साहन मिळते. 
- छाया पळसकर, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्रशाला, महालपिंप्री

Web Title: claver student encouragement for the work plane journey