वातावरण बदलाचा फटका आंबा उत्पादकांना,  यंदाही फळांचा राजा रुसला

वातावरण बदलाचा फटका आंबा उत्पादकांना, यंदाही फळांचा राजा रुसला

हडोळती (जि.लातूर) ः हडोळती (ता.अहमदपूर) परिसरातील सलग दुसऱ्या वर्षी वातावरण बदलाचा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. यंदाही फळांचा राजा रुसला आहे. सततच्या धुक्याच्या वातावरणामुळे आंबा यंदा मोहोरलाच नाही. सलग दुसऱ्या वर्षीही आंबा उत्पादकांना निसर्गाचा फटका बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा बाग खरेदीसाठी बागवान येत आहेत. यंदा झाडांना फळच नसल्याने कोणताही खरेदीदार बागेकडे फिरकला नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पाडव्याला होत असल्याने यंदाचा आंब्याचा झटक्याने आंबा उत्पादकांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे.

ज्यावर्षी चिंचेचे उत्पादन नसते त्यावर्षी आंबा हमखास पिकतो असा पूर्वापारचा अंदाज यंदा मात्र खोटा ठरला आहे. यंदा चिंचेचे उत्पादन अत्यंत अल्प असल्याने आमराई जोरदार होण्याची अनेकांना अपेक्षा होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याची चव हवेतच विरली आहे. आंब्याला मोहोर येण्याच्या हंगामातच नवीन पालवी फुटल्याने उरलीसुरली आशाही संपुष्टात आली आहे. गेल्यावर्षी पाऊस नसल्याने तर यंदा पाऊस होऊनही धुक्याच्या वातावरणामुळे आंबा उत्पादन झाले नाही. यंदा वातावरणाच्या दोषामुळे दरवर्षी एकरी दोन ते अडीच लाखांचे उत्पादन घेणाऱ्या आंबा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
 

दरवर्षी आंब्याची बाग दीड लाखाला विकत होती. गेल्या दोन वर्षांपासून वांझ आंबे जोपासताना खूप तारेवरची कसरत करावी लागत आहे. निसर्गापुढे सर्वचजण हतबल झालेले असून आर्थिक नुकसान कसे भरून निघणार याची चिंता आहे.
- भारत येरमे, शेतकरी, हिप्पळगाव

आंब्याच्या बागेवर पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन होत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आंबा उत्पादन नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडले आहे. डोक्यावर पाणी घालून वाचवलेल्या बागा वांझ ठरू लागल्याने भविष्यात आंबा बागा ठेवायच्या का नाहीत याचा विचार असून एवढे प्रगत तंत्रज्ञान असताना कृषी विभागाने वातावरणातील बदलाला पर्याय शोधायला हवा अन्यथा फळबाग लागवड पांढरा हत्ती ठरणार आहे.
- किरण लव्हराळे, हडोळती

यंदा वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादन खूप घटले आहे. तुरळक प्रमाणात कुठेतरी मोहोर आला होता; मात्र तोही टिकला नाही. शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढायला हवा होता. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले नसते. गोटीसारखा वाढ झालेला आंबाही गळ होत असून तो टिकविण्यासाठी १३ः०ः५२ ची फवारणी घ्यावी.
- सुभाष गडकर, कृषी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com