परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला १४ हजार फुट उंचावरील हरकीदून पर्वत

file photo
file photo

परभणी  : उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध असलेला हरकीदून हा गिर्यारोहकांचा आवडता दुर्गम पर्वत आहे. हौशी व धाडसी गिर्यारोहक समुद्रसपाटीपासून १४ हजार फुट उंचीवर असलेला हा पर्वत सर करण्यासाठी आवडीने निवड करतात.  

नुकतेच परभणीचे हौशी गिर्यारोहक, सामजिक कार्यकर्ते सर्पमित्र रणजित कारेगांवकर व  विष्णू मेहत्रे यांनी हा पर्वत अनुभवी गिर्यारोहक हर्षादित्य बिजापूरी यांच्या नेतृत्वाखाली व सौरभ सेमवाल यांच्या सहकार्याने आणि रामलाल गाईडच्या दिशादर्शनानुसार  ता. २० ते २२ नोव्हेंबर या तीन दिवसात सर करून उतरलाही.

देहरादून शहरापासून २५० किलोमीटर दूर असणा-या सांकरी गावातून तालुका या गावी पोहचल्यानंतर त्यांनी तेथून प्रचंड चढउतार व वेड्यावाकड्या दुर्गम पायवाटेवरून,  प्रत्येकाच्या पाठीवर स्वतःचे सामान असलेली १५ ते ३० किलो वजनाची एक बॅग घेऊन हे अंतर पायी पार केले. सुरूवातीलाच मोहिम प्रमुख हर्षादित्य बिजापुरी यांनी एकत्र चालण्याचे आवाहन करत सांगितले की, ' तुम्ही जोरात चालणार असाल तर एकटे चालाल आणि ध्येयापर्यंत जायचं असेल तर  सर्वांना मिळून चालावं लागेल '.  वाटेत राहण्यायोग्य जागा बघून निसर्गाच्या सान्निध्यात भोजन तयार करून त्याचा सर्वांनी आनंद घेतला. नैसर्गिक धबधबे, झरे, झाडे, बर्फ, पक्षी, डोंगर, द-या, चांदणीरात्र व सुपीन नदीचा खळखळाट यांचा मनसोक्त आनंद घेत व उने १० सेल्सिअस तापमानाच्या थंडीत एकमेकाला धीर देत रात्र काढत हे गिर्यारोहन त्यांनी तीन दिवसात पुर्ण केले. परतीच्या वेळी सकाळी सकाळी सहकारी सौरभ सेमवाल हे नजरचुकीने निसरड्या बर्फावरून पाय घसरून जोरात पडले, मुक्का मार लागला. कडाक्याच्या थंडीत त्यांना चालणेही अवघड झाले. सर्वांनी त्यांना धीर दिला. अनुभवी मोहीमप्रमुख हर्षादित्य यांनी त्यांना सावरत त्यांची अवजड बॅग व स्वतःचीही तितकीच मोठी बॅग घेऊन ती त्या निसरड्या वाटेच्या पर्वताखाली नेऊन ठेवली. नंतर परत येऊन सौरभ यांना आधार देत दहा किलो मीटर पर्यंत घेऊन गेले. एके ठिकाणी त्यांना झोपवून त्यांची स्ट्रेचींग करून आराम दिला व चालण्यायोग्य केले.  गिर्यारोहनात प्रत्येक सदस्याला हे असे सावरून सोबत घेणे जमलेच पाहीजे. निसरड्या वाटेत श्वासावर लक्ष ठेवून एकाग्रतेने चालणे हेही एक प्रकारचे मेडिटेशनच असते, असे बिजापूरी यांनी सांगितले.  वाटेत महीला गिर्यारोहक गाईड म्हणून कार्य करत असलेली परिता राणा यांचा परिचय करून देत धाडसी स्वभावाची ओळख करून दिली.  

परभणीचे रणजित कारेगांवकर व विष्णू मेहत्रे यांचा हा हिमालय पर्वतरांगातील गिर्यारोहनाचा पहिलाच अनुभव होता. या गिर्यारोहन व पर्यटनप्रवासातून खुप काही शिकायला मिळाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डोळ्याचे पारणे फेडणारा हरकीदून

हरकीदून हा गोविंद राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणारा हिमालय पर्वतरांगांतील एक निसर्गरम्य पर्वत असून सुपीन नदीचा इथे उगम होतो. या पर्वताच्या बाजूला स्वर्गरोहीणी, श्रीखंड व जोंधरा आदी बर्फांनी वेढलेल्या सुंदर पर्वत रांगांचे दर्शन होते. या प्रवासात डोंगरकुशीत आपणास छोट्याछोट्या सुंदर घरांनी वसलेले पूर्ती, ढाटमीर, गंगाड, पवाणी आणि ओसला आदी गावे दिसतात. तेथील गढवाली जीवन पद्धतीचे आपणास जवळून दर्शन घडते.

कसे व केव्हा जायचे

येथे जायचे असल्यास देहरादून वरून बसने किंवा कारने सांकरी मार्गे तालूका गावातून जाऊ शकतो. मार्च ते मे खुप हरित व फुलापानांनी वेढलेला परिसर असतो. त्यावेळी हौशी गिर्यारोहक व पर्यटकांची अजूनच गर्दी असते.  वनविभागाकडून परवानगी घेऊन गिर्यारोहनास जावे लागते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com