'विरोधकांच्या यात्रेची सुरवात मंगलकार्यालयात अन् सभा सभागृहात!'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

काँग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरुवात मंगल कार्यालयात करुन सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. तर, राष्ट्रवादीतही शिवस्वराज्य आणि संवाद अशा दोन यात्रा सुरु असल्याची खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडविली.

बीड : भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला रस्त्यावर स्वागतला झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही सभा घ्याव्या लागत आहेत. तर, काँग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरुवात मंगल कार्यालयात करुन सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. तर, राष्ट्रवादीतही शिवस्वराज्य आणि संवाद अशा दोन यात्रा सुरु असल्याची खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडविली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. 26) जिल्ह्यात पोचून बीड व आष्टी येथे सभा झाल्या. त्यानंतर मंगळवारी (ता. 27) फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेबाबत माहिती दिली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, सुरजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महाजनादेश यात्रेत आतापर्यंत 1641 किलोमिटरच्या प्रवासात 60 मतदार संघात पोचले आहोत. शेवटपर्यंत 32 जिल्ह्यांतील 150 मतदार संघात यात्रा पोचणार आहे. आम्ही सर्वच कामे केल्याचा दावा नसून पूर्वीच्या सरकारपेक्षा उत्तम कामे केली. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या अपेक्षा समजून घेऊन कामे करणार आहोत. आम्हीच प्रश्न सोडवू शकतो हे लोकांच्या लक्षात आल्याने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. सभांव्यतिरिक्त रस्त्यांवर यात्रेच्या स्वागताला एवढी गर्दी होतेय की तिथेही आम्हाला सभा घ्याव्या लागत आहेत. विरोधकांनी सुरु केलेल्या यात्रेतून त्यांचाच पर्दाफाश होत असल्याची टिका करत काँग्रेसला त्यांची यात्रा मंगल कार्यालयात सुरु करावी लागल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेनंतर आता संवाद यात्रा काढली आहे. त्यांनी सत्ते असताना लोकांशी संवाद साधण्याऐवजी स्वत:शीच संवाद साधला नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या गुन्ह्याबाबत विचारले असता, गुन्हा दाखल झाला असून आता तपास करुन आरोपपत्र अशा सर्व बाबी नियमांनुसार होतील असे उत्तर त्यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis criticizes opposition party rally