सरकारचे बुलेट ट्रेनप्रमाणे काम ; चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

सरकारचे बुलेट ट्रेनप्रमाणे काम ; चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकार बुलेट ट्रेनप्रमाणे काम करीत आहे. यामुळे पाच वर्षांतील कामे दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली जनभावना आता कमी झाली आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेगटाचे ४५ खासदार आणि विधानसभेत दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत केला.

संघटनात्मक बैठकीनिमित्ताने बावनकुळे हे औरंगाबादेत आले, असता त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की महाविकास आघाडीने विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ बरखास्त केले. १२ आमदारांच्या नियुक्त्यांशी त्यांचा संबंध जोडला. १२ आमदार नियुक्त करा मगच विकास मंडळे पुनरुज्जीवित करतो अशी मागासभागांविरोधी भूमिका घेतल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.

आता शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे. २०२४ च्या निवडणुकीत राज्यात सर्व निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्याचे नियोजन आम्ही केले आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, विक्रांत पाटील, संजय कोडगे, सरचिटणीस संजय केणेकर, भगवान घडामोडे, प्रवीण घुगे, अनिल मकरिये, विजय औताडे उपस्थित होते.

शहांवर आरोप म्हणजे सूर्याला दिवा दाखविणे

जेव्हा महाविकास आघाडी केली तेव्हा निवडणुका घ्या असे ठाकरे म्हणाले नाहीत. आता राज्यात विधानसभा निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिलेले आव्हान हे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्याचा धसका घेतला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिंदे गटाचे उमेदवारही निवडून आणू

खरी शिवसेना कोणाची याचा वाद न्यायालयात आहे. निकाल विरोधात लागल्यास भाजप निवडणुकीला तयार असेल का असे माध्यमांनी विचारल्यानंतर बावनकुळे म्हणाले, की आम्ही ३६५ दिवस २४ तास निवडणुकीसाठी तयार आहोत. शिंदे गटाचे जेवढे उमेदवार राहतील, त्यांना निवडून आणणार आहे. पंकजा मुडे नाराज नसल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे दिलदार

राज ठाकरे हे आमचे जुने मित्र आहेत. ते दिलदार आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी घेतलेली भूमिका वैयक्तिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cm Eknath Shinde Bjp Government Work Mla Lok Sabha Assembly Election Chandrashekhar Bawankule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..