सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

आमदार मोहन हंबर्डे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, ईसीएचएसचे अधिकारी मेजर बी. थापा व जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती.

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते शनिवारी (ता. सात) झाले. यावेळी आमदार मोहन हंबर्डे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, ईसीएचएसचे अधिकारी मेजर बी. थापा व जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांनी स्वत: प्रत्येक वर्षी ११ हजार रुपये देवून इतर सर्व सहकाऱ्यांकडून निधी गोळा करुन देण्याचे सांगून हा निधी एक करोड पर्यंत जमा होईल असे आश्वस्त केले. यामध्ये सर्वांना सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, व्यापारी वर्ग व इतर दानशुर व्यक्ती आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम मोठया स्तरावर आयोजीत करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. आमदार श्री. हंबर्डे म्हणाले की, स्वत: माजी सैनिक परिवारातील आहे माझे बंधू जवळचे नातेवाईक हे सैन्यामध्ये आहेत. मला सर्व सैनिकांची, माजी सैनिकांची आत्मीयता आहे. 
 
शासनाकडुन ३५ लाख ५० हजार रुपये एवढे उद्दिष्ट 

अध्यक्षीय भाषणात डॉ. सचिल खल्लाळ यांनी ध्वजनिधी हा दोनशे प्रतिशत जमा होईल असे सांगुन सैनिकांच्या/ माजी सैनिकांच्या कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्यांनी सरळ भेटावे आम्ही त्यास प्राधन्य देवून असे नमुद केले. सन २०१८- १९ साठी शासनाने जिल्ह्याला ३५ लाख ५० हजार ५१२ रुपये एवढे उद्दिष्ट दिले होते. ते जिल्हयाने ५१ लाख १७ हजार रुपये जमा करुन १४५ टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे. यावर्षी देखील शासनाकडुन ३५ लाख ५० हजार रुपये एवढे उद्दिष्ट दिले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये दुप्प्टीने निधी जमा करुन उद्दीष्ट पुर्ण करण्यात येईल, असे यावेळी डॉ. खल्लाळ यांनी सांगितले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांना पत्रक पाठवून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर २०१९ मध्येच निधी जमा करण्याचे  आवाहन केले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय शेळगांव (गौरी) चा सहभाग

ग्रामपंचायत कार्यालय शेळगांव गौरी यांनी एक लाख एक हजार रुपये निधी जमा केल्याने संजय पाटील शेळगांवकर यांचा विशेष सत्कार आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील  उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र व सैनिकाबाबत महत्व असणारे विषयाचे व इतर कार्यालयीन उपयुक्त पुस्तके भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

माजी सैनिकास क्रिडा क्षेत्रातील विशेष गौरव पुरस्कार

या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार करण्यात आला. आमदार हंबर्डे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप व महाराष्ट्र राज्य तर्फे माजी सैनिकास क्रिडा क्षेत्रातील विशेष गौरव पुरस्कार प्रकाश लोंखडे यांचा पाल्य कुमार आशिष यास रोख रक्क्म १० हजार रुपये प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आला. पत्रकार योगेश लाठकर व सुधाकर शंकरराव दिवान यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दरवर्षी प्रमाणे प्रदान केला.

शहिदांना श्रद्वांजली

निधी संकलनाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी  कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ व प्रमुख पाहुणे यांना ध्वज लावून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. यानंतर सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collection of Armed Forces Flag Day Fund