
पाच लाखांची मागणी करत खोकल्याच्या औषधात विष मिसळून बहीण भाच्याचा खून केल्याची तक्रार भावाने मानवत पोलिस स्टेशनला दिली. यातील आरोपींना अटक करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मयत विवाहितेचा मृतदेह सासरच्या घरी आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मानवतः पाच लाखांची मागणी करत खोकल्याच्या औषधात विष मिसळून बहीण भाच्याचा खून केल्याची तक्रार भावाने मानवत पोलिस स्टेशनला दिली. यातील आरोपींना अटक करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मयत विवाहितेचा मृतदेह सासरच्या घरी आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी विवाहितेचा पती व सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील इळरद येथील कालींदा यांचा विवाह मानवत शहरातील पर्वतकुमार उर्फ बाळू शिंदे याच्याशी १४ मे २०१७ रोजी पार पडला होता. विवाहानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरून पाच लाख घेऊन ये अशी मागणी करत कालींदाचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. माहेरच्या नातेवाईकांनी काही दिवसात पैशाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची दमछाक
अशी घडली घटना
दहा डिसेंबर रोजी कालींदा यांना खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी पती बाळू शिंदे यांना खोकल्याचे औषध आणण्यास सांगितले. कालींदा यांनी स्वतः औषध घेऊन आपला दोन वर्षाचा मुलगा सुमित याला देखील खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी मुलांना देखील खोकल्याचे औषध दिले. सदर औषध दिल्यानंतर कालींदा व त्यांच्या मुलाला उलटीचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी परभणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलगा सुमित याचा मृत्यू झाला. या वेळी पती बाळू शिंदे याने आपल्याविरोधात जवाब दिल्यास नांदविणार नाही, अशी धमकी देऊन चुकीने औषध पिल्याचा जबाब देण्यास भाग पाडले.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात संभाव्य पॅनल प्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात
सायंकाळी उशिरा पती बाळू शिंदे यास अटक
उपचार सुरू असताना १४ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास कालींदा यांचा मृत्यू झाला. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी कालींदा यांचा मृतदेह बाळू शिंदे राहत असलेल्या विठ्ठल नगर येथील घरी आणून ठेवला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस उपअधीक्षक वसंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार, उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. पोलिस प्रशासनाने कारवाइचे आश्वासन दिल्यानंतर मयत कालींदा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास मयताचा भाऊ गजानन खरात यांच्या फिर्यादीवरून पती बाळू शिंदे व सासू अंजना योगेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी उशिरा पती बाळू शिंदे यास अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे करत आहेत.
संपादन ः राजन मंगरुळकर