Beed पालकमंत्र्यांकडून नुकसानीची सर्वंकष पाहणी गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul-Save

अतिवृष्टीचा हाहाकार गेवराईत पाहणीची औपचारिकता नाही पुरेशी

Beed : पालकमंत्र्यांकडून नुकसानीची सर्वंकष पाहणी गरजेची

बीड : अगोदर पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान आणि मागच्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजवला. प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असल्या तरी शासनाला काही देणे-घेणे आहे का, हा प्रश्न आहे. सरकारचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांचे हाल पाहण्याची गरज आहे.

गेवराईजवळ येत नुकसानीच्या पाहणीची औपचारिकता त्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, एकदा सर्वंकष पाहणीसाठी दौरा महत्त्वाचा आहे. साधारण तीन महिन्यांपासून जिल्ह्याची धुरा प्रशासनाच्याच खांद्यावर आहे. अगोदर पालकमंत्री नसताना आणि आता असूनही. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटल्यानंतरही अतुल सावे यांना प्रशासनासोबत बैठक घ्यायला मोठा वेळ लागला.

प्रशासनासोबत बैठकीला कमी आणि संघटनांच्या सत्कार आणि भेटी - गाठींसाठीच त्यांचा मोठा वेळ गेला. दरम्यान, यंदा निसर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोपला आहे. अगोदर पावसानंतर खरिपाची पेरणी झाली. मात्र, नंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर दुबार पेरणीचे संकट उद्भवले.

त्यानंतर गोगलगायींनी सोयाबीन पिकांवर प्रादुर्भाव केला. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नंतर ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने चांगलेच डोळे वटारले. काही भागात २१ दिवस तर काही भागात २५ दिवस पाऊस नव्हता. सोयाबीनला शेंगा लगडण्याचा हा कालावधी होता. त्यामुळे शेंगांमध्ये सोयाबीनच्या बियाच मोठ्या होऊ शकल्या नाहीत.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि ४८ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा २५ टक्के पालकमंत्र्यांकडून नुकसानीची सर्वंकष पाहणी गरजेची अग्रिम द्यावा, अशी अधिसूचना काढली. या काळात जिल्ह्याला पालकमंत्रीच नव्हते. मात्र, पालकमंत्री म्हणून भाजपचे अतुल सावे यांच्या गळ्यात माळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल, ही अपेक्षा फोल ठरत आहे.

त्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सर्व जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना अग्रिम भेटण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, नेमके यानंतर कंपनीने अगोदरच १५ महसूल मंडळे टाळली होती. आता तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेतील २० महसूल मंडळे वगळली आहेत. आता मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे.

अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. आष्टी तालुक्यातील काही भागात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतातील काढून टाकलेले व उभे असलेले सोयाबीन पीक पाण्याने घेरले आहे. त्यामुळे पीक पूर्णतः सडून गेले आहे. कापसाचीही हीच गत आहे. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या असून दोड्यांना कोंब फुटत आहे.

प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतांच्या बांधावर जात आहेत. मात्र, शासनाचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री अतुल सावे यांनी वाटेवर असलेल्या गेवराई जवळ येत पाहणीची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यानंतरही रोजच पाऊस असल्याने जिल्हाभरात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. आता तरी अतुल सावे यांनी जिल्ह्यात येऊन नुकसानीची सर्वंकष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.