खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसाच्या आनंदावर निलंबनाच्या कारवाईने विरजन

राजेश दारव्हेकर 
Tuesday, 22 September 2020

संसदेमध्ये कृषी बिलाला विरोध करणाऱ्या राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये हिंगोलीचे खासदार ॲड.राजीव सातव यांचाही समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

हिंगोली : वाढदिवस असूनही त्यापेक्षा राज्यसभेचे कामकाज महत्वाचे असे मानून सभागृहात सक्रीयपणे सहभाग घेणाऱ्या कॉँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर सोमवारी (ता.२१) निलंबनाची वेळ आली. त्यामुळे त्यांच्या हिंगोलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपच्या सरकारवर टिका केली आहे.
    
खासदार ॲड. राजीव सातव यांचा सोमवारी (ता.२१) वाढदिवस झाला. त्यानिमित्त हिंगोलीसह इतर ठिकाणी कॉँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे श्री. सातव यांचे निलंबन झाल्याची बातमी धडकली. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत सरकारने आणलेल्या कृषी बिलावरून गोंधळ झाला होता. या बिलाला विरोध करणाऱ्या राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये येथील खासदार ॲड.राजीव सातव यांचा समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
 
खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीसह त्यांच्या मुळ गावी कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ येथे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, या आनंदोत्सवात त्यांच्यावर राज्यसभेत कृषी बिलावरुन झालेल्या गोंधळामुळे खासदार राजीव सातव यांचे निलंबन झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. कळमनुरी येथे अनेकांनी काळ्या पट्ट्या गळ्यात घालून पंतप्रधानाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जिल्ह्यात खासदार सातव यांचा उत्साहात होणाऱ्या वाढदिवसात त्यांच्या निलबंनाचे विघ्न आले. 

कळमनुरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

खासदार राजीव सातव यांच्या निलंबनाचे वृत्त माहित होताच जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते, बबन डुकरे, ॲड.अझहर कादरी, ॲड.इलियास नाईक, निहाल कुरेशी, शैलेश पवार, फारुख बागवान, तय्यब अली, मैसन चाऊस, मोहम्मद रफीक, बबलू पठाण, उमर फारूक, अयाज नाईक यांच्यासह कार्यकर्ते बस स्थानक परिसरात गोळा झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून दहन करण्याच्या तयारीत असतानाच कळमनुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध घोषणा देणाऱ्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Rajiv Satav has been suspended