राज्यघटनेला सुरूंग लावण्याचे भाजपचे प्रयत्न : थोरात

भास्कर बलखंडे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

राज्यघटना वाचविण्यासाठी  आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यसाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॅंाग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  सोमवारी (ता. 5) येथे केले.

जालना : राज्यघटनेने देशातील उपेक्षित सर्वसामान्य नागरिकाला हक्क अधिकार दिले आहेत, त्या राज्यघटनेलाच सुरूंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातील भारतीय जनता पक्षाकडून जोरकसपणे सुरू आहेत. शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात कर्ज वितरित केले गेले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी  आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यसाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॅंाग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  सोमवारी (ता. 5) येथे केले.

थोरात यांच्या उपस्थितीत जालना जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा झाला. त्या मेळाव्यात थोरात बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह माजी आमदार कल्याण काळे, अनिल पटेल, शकुंतला शर्मा, धोंडिराम राठोड, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विलास औताडे, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, शेख महेमुद प्रा. सत्संग मुंडे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात पुढे म्हणाले, देशातील उपेक्षितांना राज्य घटनेने मतदानासह अन्य अनेक महत्वाचे अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामुळेच राज्यघटना टिकली पाहिजे. आपण वारकरी संप्रदायाची विचारधारा मानणारे आहोत. समतेच्या विचारधारा असलेल्या राज्यघटनेच्या सरनाम्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे. कर्जमाफी करताना जाचक अटी लादल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांमा पुरेशा प्रमाणात लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांना फक्त 30 टक्केच कर्ज वाटप झाल्याचे स्पष्ट करून राष्ट्रीय बॅंकांनी केवळ 7 टक्केच कर्ज वाटप केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

शिवसेना सरकारमध्ये असतानाही वीमा कंपन्याच्या चुकीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयावर मोर्चे काढत आहे. विधिमंडळात हा मुद्या उपसि्थित करण्याऐवजी कंपन्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित करून हे सरकाकर केवळ धनदांडग्याचे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठवाड्याच्या प्रश्नासाठी लढणार
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. शेंद्रा,चिखलठाणा येथील अनेक उद्योग बंद पडले असल्याने युवक बेरोजगार झाले आहेत.पावसाअभावी तकर्यांचे प्रश्नही  बिकट  आहेत.अशावेळी मुख्यमंत्री मात्र जनादेश यात्रेत फिरत असल्याचे टीका करून ते म्हणाले की पक्षावर निष्ठा नसलेले लोक पक्षाबाहेर पडत आहेत,त्यामुळे पक्षाचे शुध्दीकरणच होणार आहे.आयाराम गयाराममुळे पक्षांतरबंदी कायद्याला हरताळ फासल्या जात आहे. मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे खांद्याला खांदा लावून संघर्ष 
करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ देशमुख यांनी तर  शेख महेमुद यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress state president Balasaheb Thorat attacks on bjp