हिंगोलीला दिलासा : शनिवारी १५ रुग्ण कोरोनामुक्त तर आठ पॉझिटिव्ह

राजेश दारव्हेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पुन्हा नव्याने आठ रुग्णांची भर पडली आहे. यातील तीन रुग्ण हे अँटीजन तपासणीत सापडले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी शनिवारी (ता. एक) रात्री उशिरा सांगितले.

हिंगोली : येथील सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी (ता. एक) पंधरा रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने आठ रुग्णांची भर पडली आहे. यातील तीन रुग्ण हे अँटीजन तपासणीत सापडले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी शनिवारी (ता. एक) रात्री उशिरा सांगितले.

प्राप्त अहवालानुसार पंधरा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील बारा रुग्ण  असून, यात तीन जुने पोलीस स्टेशन, शाहूनगर चार, जिल्हा परिषद वसाहत तीन, हरवाडी दोन अशा बारा रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोना केअर सेंटर सेनगाव येथील एक रुग्ण बरा झाला आहे. यामध्ये गंगानगर येथील एकाचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्ड येथील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये वसमत शिवाजीनगर येथील दोघांचा समावेश आहे.

शनिवारी (ता. एक) आठ रुग्ण आढळून आले

जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शनिवारी (ता. एक) आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस रोड हिंगोली येथील एक ६५ वर्षाीय पुरुष रुग्ण असून तो खाजगी रुग्णालयात अँटीजन टेस्टमध्ये आढळून आला आहे. तालुक्यातील खंडाळा येथील एका साठ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अँटीजन टेस्टमध्ये आढळून आले. याशिवाय परभणी, पूर्णा (जंक्शन) येथील महावीर नगरातील एका २७ वर्षीय महिलेला कोरोना बाधा झाल्याचे अँटीजन टेस्टमध्ये उघड झाले आहे. तसेच हिंगोली येथील यशवंतनगर येथे तीस वर्षाच्या महिलेस लागण झाली आहे. वसमत बाराशिव येथे एक २१ वर्षीय महिला तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे तिघे सापडले असून यात ५०, ३० वर्षीय महिला असून एका दहा वर्षाच्या मुलीला लागण झाली आहे.

हेही वाचा -  मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६६२ रुग्ण झाले आहेत

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६६२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ४५० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. व आज घडीला एकूण २०४ रुग्णांवर उपचार चालु आहेत. आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकूण ७,५६३ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ६,६८६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ६,९३८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ६०० व्यक्ती भरती आहेत. शनिवारी (ता. एक) २१२ जणांचे अहवाल येणे, स्वॅब घेणे प्रलंबित आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायप्याप मशीनवर ठेवले आहे. आज रोजी एकूण १९ रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to Hingoli: On Saturday, 15 patients were corona-free and eight were positive hingoli news