esakal | कंट्रोल सेंटरची राहणार 'ऑरिक'वर कमांड!
sakal

बोलून बातमी शोधा

कंट्रोल सेंटर

मूलभूत सोयींपासून वाहनांच्या हालचालीवर करडी नजर 

कंट्रोल सेंटरची राहणार 'ऑरिक'वर कमांड!

sakal_logo
By
आदित्य वाघमारे

औरंगाबाद - सुरक्षा असो वा मूलभूत गरजा... दुरुस्ती असो वा बिघाड... विजेच्या तक्रारी असो वा पर्यावरणीय सूचना.. अशा दोन डझन बाबींच्या तक्रारींची सोडवणूक एकाच छताखाली करणारे देशातील पहिले कमांड कंट्रोल सिस्टीम "ऑरिक'ने कार्यान्वित केले आहे. शेंद्रा-बिडकीनच्या सुमारे दहा हजार एकरांवर एकछत्री अंमल असणाऱ्या या यंत्रणेचे उद्‌घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. सात) होणार आहे. 

वीज गुल झाली तर महावितरणचा माणूस शोधा, पाणी येत नसेल तर महापालिकेच्या लाइनमनला साकडे घाला, इंटरनेट बंद असेल तर ऑपरेटरकडे डझनभर तक्रारी करा, अशा गोष्टी इतिहासजमा करण्यासाठी "ऑरिक'मध्ये कमांड कंट्रोल सिस्टिम अस्तित्वात आली आहे. त्यामुळे तक्रारी घेऊन कार्यालयांचे खेटे मारण्याची गरज राहणार नाही. 'ऑरिक'च्या अॅपवरून तक्रार करून तिचा निपटारा करण्याची जबाबदारी निश्‍चित करण्याचे काम अत्याधुनिक सेंटर करणार आहे. गॅस मोजणारे सेन्सर्स पर्यावरणातील असमतोल आणि त्याचा स्रोत काही सेकंदांत प्रशासनाला या सेंटरद्वारे कळवण्यात येणार आहे. 

तक्रार ते निपटारा 
एखाद्या कंपनीला किंवा घराला पाण्याचा पुरवठा नियमित होत नसेल तर त्याच्या तक्रारीची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही. ऑरिक नावाचे ऍप डाऊनलोड करून त्यावर तक्रार नोंदवली, की ती तक्रार कमांड कंट्रोल रूममध्ये धडकणार. शहरातील सगळ्या पाइपलाइन्सला सेन्सर्स असल्याने तक्रारीची खातरजमा करून तक्रारदारापर्यंत जाणाऱ्या माणसाकडे ती वळवण्यात येईल. एका दिवसात या तक्रारीचा निपटारा केवळ एका मेसेजवर होईल. 
 
24 तास निगराणी करणारी यंत्रणा 
ऑरिकमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक गाडीचा प्रवास तपासता येणार आहे. चोवीस तास होणारे अमर्याद रेकॉर्डिंग साठवण्यासाठी क्‍लाऊड यंत्रणा कार्यान्वित असल्याने कोणत्याही वेळेचा डेटा उपलब्ध होणार आहे. ही यंत्रणा चालवण्यासाठी एका शिफ्टमध्ये सात माणसे या सेंटरमध्ये राहणार आहेत. तीन शिफ्टच्या माध्यमातून 21 जणांना रोजगारही मिळेल. गळत्या, गडबड, यंत्रांशी झालेल्या छेडछाडीची माहिती अवघ्या काही सेकंदांमध्ये या कंट्रोल सेंटरला मिळणार आहे. 
 
कंट्रोल सेंटरला याची जोडणी 
पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, गळती तपासणी, एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लॅंट, पथदिवे, पर्यावरणीय मोजमाप करणारी यंत्रणा, जिओग्रॉफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम (जीआयएस), वायफाय कनेक्‍टिव्हिटी, सीसीटीव्ही, फायर हायड्रंट, परवानगीच्या अर्जांचा निपटारा करणारी यंत्रणा, तक्रारींचा सोक्षमोक्ष, वाहनांवरील निगराणी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम, युटिलिटी लाइन्स आदी. 
 

ऑरिकमधील सुविधांना एकाच व्यासपीठावरून ऑपरेट, दुरुस्ती आणि त्यांच्याशी निगडित तक्रार निवारण कमांड कंट्रोल सेंटर करणार आहे. शेंद्रा-बिडकीन या दोन्ही औद्योगिक शहरांची
निगराणी या सेंटरमधून होईल. 
- गजानन पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, ऑरिक 
-- 
'ऑरिक'च्या लौकिकाला साजेशी ही यंत्रणा आहे. आतापर्यंत आपण पाश्‍चिमात्य राष्ट्रांपेक्षा मागे आहोत म्हणायचो; मात्र आपण त्यांच्यापेक्षा कणभर सरस आहोत हे म्हणायला जागा आहे. 
- अतुल सावे, उद्योग राज्यमंत्री 
 

loading image
go to top