Corona Breaking ; हिंगोलीत मंगळवारी दुपारी २८ रुग्ण पॉझिटिव्ह...

राजेश दारव्हेकर
Tuesday, 14 July 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मंगळवारी (ता.१४) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक १९ रुग्ण हिंगोली तालुक्यातील आहेत. 

हिंगोली ः जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मंगळवारी (ता.१४) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक १९ रुग्ण हिंगोली तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ वसमत तीन, सेनगाव, औंढा प्रत्येकी एक तर कळमनुरी तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी सांगितले. एसआरपीएफ जवानानंतर हा एवढा मोठा आकडा पुन्हा आल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील पेन्शनपुरा, गोदावरी हॉटेलजवळ एक ४१ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून, त्याचा बाहेर गावावरून आल्याचा पूर्व इतिहास नाही. परंतू, तो सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. दुसरा रुग्ण जो ३२ वर्षीय पुरुष असून तो औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील रहिवासी आहे. या व्यक्तीचाही पूर्व इतिहास नसल्याने हा व्यक्ती देखील सारीच्या आजाराने रुग्णालयात भरती आहे. त्यानंतर सेनगाव बसस्थानक जवळील एका ३५ वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप येत असल्याने रुग्णालयात भरती आहे. या व्यक्तीचा पण पूर्व इतिहास नाही.

हेही वाचा - उशिरा येणाऱ्या मंत्र्यांनाही खडसावणारे हेडमास्तर

पेडगाव येथील अकरा रुग्णांचा समावेश 
प्राप्त अहवालानुसार मंगळवारी सर्वाधिक रुग्ण हिंगोली तालुक्यातील असून पेडगाव येथील अकरा रुग्णांचा यात समावेश आहे. यामध्ये ३५, ३०, ५५, २२, पुरुष तर ४५, २५, ३०, २२, ५५ महिला तसेच अकरा वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीचा कोरोना पॉझिटिव्हमध्ये समावेश आहे. हे सर्व जण कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. याशिवाय वसमत येथील दोघे जण असून यात एकजण स्टेशन रोड येथील १३ वर्षीय मुलगी असून ही कोरोना व्यक्तीच्या संपर्कातील आहे. तर दुसरा २६ वर्षीय तरुण असून गणेशपेठ येथील रहिवासी आहे. तो पुणे येथून गावी परतला आहे.

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा...

परजिल्ह्यातून परतलेल्यांचा समावेश 
हिंगोली तालुक्यातील रामादेऊळगाव येथील ३०, २५ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलगी, ११ वर्षाचा मुलगा हे चौघे जण मुंबईवरून गावी परतले आहेत. तर दुसरा याच गावातील २४ वर्षाची महिला असून ती पुणे येथून गावी परतली आहे. तसेच पहेनी येथे २२, ४८ वर्षाच्या या दोन महिला औरंगाबाद येथून गावी परतल्या आहेत. तर माळधामणी येथील एका २९ वर्षीय तरुणाला लागण झाली असून तो मुंबईवरून परतला आहे. तसेच जयपूरवाडी येथे ४५ वर्षीय महिला सुरत येथून गावी परतली आहे.

चार रुग्णांची प्रकृती गंभीर
आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आलेल्या १९ रुग्णापैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच यातील दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपाप मशीनवर ठेवले आहे. एकूण सहा रुग्णांची तब्येत चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यात ३६१ रुग्ण झाले असून, त्यापैकी २८७ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजमितीला एकूण ७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

(संपादन ः राजन मंगरुळकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; 28 patients tested positive in Hingoli on Tuesday afternoon ..., Hingoli news