esakal | Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात चार मृत्यू तर ८१ बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी शहरातील तिघांचा तर जिंतूर तालुक्यातील एक अशा चौघांचा गुरुवारी (ता.२०) मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. 

Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात चार मृत्यू तर ८१ बाधित 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी  ः परभणी शहरातील तिघांचा तर जिंतूर तालुक्यातील एक अशा चौघांचा गुरुवारी (ता.२०) मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ९० झाली आहे. तसेच दिवसभरात ८१ बाधित आढळून आले आहेत. मृतांमध्ये परभणी शहरातील आनंद नगर येथील ६५ वर्षीय महिला, प्रताप नगरातील ५६ वर्षीय पुरुष, व्यंकटेश नगरातील ६५ वर्षीय पुरुष आणि  जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

परभणी शहरातील १५ केंद्रांवर ५६४ व्यापाऱ्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात निगेटिव्ह ५५७ तर सात जण पॉझिटिव्ह आढळले. पूर्णा तालुक्यात गुरुवारी ६६ व्यक्तींची रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यात ११ जण बाधित आढळले.


हेही वाचा - Video- परभणी : गणेशोत्सव व मोहरमसाठी पोलिस सज्ज

जिंतूरला पोलिस निरीक्षक, महिला पोलिसासह १३ पॉझिटिव्ह 
जिंतूर ः शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी (ता.२०) पोलिस निरीक्षक, एक महिला पोलिस कर्मचारी यांच्यासह एकूण १३ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात १५ ऑगस्टपासून आरोग्य विभागातर्फे रॅपिड अॅंटीजेन किटद्वारे व्यापारी नागरिकांच्या कोरोना टेस्ट घेण्यात येत आहे. गुरुवारी एकूण ७३ नागरिक, व्यापारी, पोलिस यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आमदार कॉलनीमधील रहिवासी ४८ वर्षीय पोलिस निरीक्षक व ४० वर्षीय त्यांच्या पत्नी, बलसा रोडवरील ४१ वर्षीय महिला पोलिस कर्मचारी, शिवाजीनगरातील एक २४ वर्षीय मेडिकल चालक, हुतात्मा स्मारक भागातील ६९ व ३८ दोन पुरुष, तर ईटोलीकर गल्लीत एकाच कुटुंबातील सात सदस्य ज्यामध्ये ९० व ४६ वर्षीय पुरुष, ७५ व ४० वर्षीय महिला आणि १८ व १६ वर्षीय दोन मुली व एक आठवर्षीय बालकाचा समावेश आहे. 
 
हेही वाचा - कामचुकार ३३ विस्तार अधिकाऱ्यांना सीईओंचा दणका, काय आहे प्रकरण?

कोरोना पॉझिटिव्ह निघूनही वालूर आरोग्य केंद्र सुरू 
 सेलू ः प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची शनिवारी (ता.१५) स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. यावेळी एक ३५ वर्षीय परिचारिका बाधित आढळून आल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले. कोरोनाबाधित परिचारिका व निगेटिव्ह असलेल्या त्या परिचारिका पतीस सेलू येथील कोरोना केअर सेंटरमध्ये तत्काळ दाखल केले. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रास अद्याप एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ना भेट दिली किंवा त्या बाधित आढळून आलेल्या अति संपर्कातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र ना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. उलट नेहमीप्रमाणे आरोग्य केंद्रातील सर्व सेवा सुरळीत सुरू असून आरोग्य कर्मचारी तसेच या ठिकाणी येत असलेल्या रुग्णाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. स्वातंत्र्यदिनी आरोग्य केंद्रात सकाळी ध्वजवंदन झाल्यानंतर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाठोरे यांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रातील काही आरोग्य कर्मचारीही उपस्थित होते. दरम्यान, कर्मचारी बैठक आटोपल्यानंतर उपस्थित परिचारिका, आरोग्य सहायक यांच्या उपस्थित एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाठोरे यांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली. यात सर्वांसमवेत असलेल्या एक ३५ वर्षीय परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परिचारिका व त्यांच्या पतीला तत्काळ सेलू येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु संबंधित परिचारिका राहत असलेल्या निवासस्थानातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी यापैकी कुणालाही क्वारंटाइन केले नाही. शनिवार(ता.१५) नंतर वालूर गावातील काही भागातील तसेच काही गावातील लहान बालक, गरोदर माता यांचे आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. 


परभणी जिल्हा 
एकूण बाधित - एक हजार ८११ 
आजचे बाधित - ८१
आजचे मृत्यु - चार 
एकूण बरे - ७५६ 
उपचार सुरु असलेले - ९६५
एकूण मृत्यु - ९०

संपादन ः राजन मंगरुळकर