esakal | Corona Breaking ; हिंगोलीत शुक्रवारी १२ पॉझिटिव्ह, आठ रुग्णांची कोरोनावर मात 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. सात) नव्याने एकूण १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नऊ रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तर तीन रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. 

Corona Breaking ; हिंगोलीत शुक्रवारी १२ पॉझिटिव्ह, आठ रुग्णांची कोरोनावर मात 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता. सात) नव्याने एकूण १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नऊ रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तर तीन रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. आठ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 

रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे घेतलेल्या तपासणीमध्ये फलटण हिंगोली एक, बासंबा ता. हिंगोली दोन, बसस्टँड कळमनुरी पाच, ब्राह्मणगल्ली कळमनुरी एक असे नऊ रुग्ण अँटीजेन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेल्या असोनंडा औंढा एक, शिवाजीनगर सेनगाव एक, रामगल्ली हिंगोली एक, असे तीन रुग्ण मिळून आले आहेत. 

आठ रुग्ण ठणठणीत बरे 
आज एकूण आठ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद वसाहत दोन, तोफखाना तीन, गाडीपुरा एक, पेन्शनपुरा एक, महादेववाडी एक अशा आठजणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण ८०८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५६३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आजघडीला एकूण २३७ रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथे भरती असलेल्यांपैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सुरू आहे. तर पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बाय पॅपवर ठेवण्यात आले आहे. सध्या एकूण १२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

हेही वाचा - कोरोना संकट : मृत्यूनंतर अंत्यविधीची जबाबदारीही प्रशासनाच्या खांद्यावर, कुठे गेली माणूसकी?

शहरात रॅपिड अँटीजेन टेस्टचे नियोजन 
हिंगोली : शहर व परिसरात असलेल्या ग्रामीण भागातील भाजीपाला, फळे व इतर व्यावसायिकांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट बंधनकारक केल्याने शुक्रवारी (ता. सात) उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीस तहसीलदार गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक श्री.सय्यद, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट बंधनकारक असल्याने याकडे सर्वांनी लक्ष देऊन जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घ्यावी, अशा सूचना श्री. चोरमारे यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक ! शासनाच्या या निर्णयामूळे तलाठीपदी नियुक्त झालेल्या उमेदवारांवर ‘आत्महत्येची वेळ’

कळमनुरीत व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी 
कळमनुरी : शहरात आरोग्य विभागाकडून आजाराच्या पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापारी वर्गाची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येत असून आजारी असलेल्या व उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या ४३ रुग्णांच्या तपासणीमध्ये नऊजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर येथील कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत. शहरात विविध आस्थापनांद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापारी वर्गाने स्वतःची रॅपिड अँटीजेन तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. त्यादृष्टीने येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे तपासणीकरिता आवश्यक असलेल्या किट उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरामधील सर्व प्रकारचा व्यवसाय करणारे व्यापारी यामध्ये कृषी केंद्रचालक, खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर, उपाहारगृह, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, मटण विक्रेते, भाजी विक्रेते यासह खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या सर्व व्यापारी वर्गाची तपासणी करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने शनिवारी (ता.आठ) शहरातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांच्या संचालकांची या किटद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद मेने यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, परिचारिका, आर. बी. एसके व आयुष विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या याकामी नियुक्त्या केल्या आहेत. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या ४३ जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये नऊजणांना आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर या रुग्णावर येथील कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर