Corona Breaking ; परभणी तीन, सेलू दोन तर सोनपेठ, पाथरी, जिंतूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण 

गणेश पांडे
Tuesday, 14 July 2020

जिल्ह्यात मंगळवारी रात्री सात वाजेपर्यंत आलेल्या अहवालात एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये परभणी, सेलू, सोनपेठ, पाथरी, जिंतूर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.  

परभणी ः जिल्ह्यात मंगळवारी रात्री सात वाजेपर्यंत आलेल्या अहवालात एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये परभणी, सेलू, सोनपेठ, पाथरी, जिंतूर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. यात परभणी शहरातील तीन, सेलू तालुक्यातील वालूर येथील दोन तर सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील एक, पाथरी तालुक्यातील कानसुर येथील एक व जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.  

जिल्ह्यातील १७ जण मंगळवारी कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यात परभणी शहर आणि तालुक्यातील १६ व पुर्णा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह संख्या २९०
झाली आहे. यामध्ये १४४ जणांवर उपचार सुरू तर १३८ जण उपचार घेत घरी परतले आहेत. तसेच एकूण मृत्यू आठ झाले आहेत. 

हेही वाचा - उपविभागीय अधिकाऱ्यांनी दीडशे शिक्षकांना परत पाठविले, का ते वाचा...  

जावयाने दिला सासुरवाडीला कोरोनाचा प्रसाद 
सोनपेठ ः कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या जावयाने आपल्या पत्नीला कोरोना होऊ नये म्हणून तिच्या माहेरी आणून सोडले; परंतु आता ती महिलादेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भासेगावकरांचा जीव टांगणीला लागला आहे. सोनपेठ तालुक्यातील भासेगाव येथील एक पस्तीसवर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी (ता. १४) आरोग्य विभागाला प्राप्त झाला. संबंधित महिला ही परळी (जि. बीड) येथून नुकतीच आपल्या माहेरी पतीसह आली होती. त्यानंतर त्या महिलेचा पती हा परळी येथे पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समजताच ती महिला तसेच तिच्या आईसह अजून सातजणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तर संबंधित महिला व तिच्या वृद्ध आईला परभणी येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यामध्ये संबंधित पस्तीसवर्षीय महिला ही पॉझिटिव्ह आली असून, तिची वृद्ध आई मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती सोनपेठ येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिली. 

हेही वाचा - बंद दिव्यांमुळे परभणीकरांना पथ शोधणे कठीण

गंगाखेडची वाटचाल कोरोना ‘हॉटस्पॉट’कडे 
गंगाखेड : शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख सुरूच आहे. शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कार्यक्रमास हजेरी लावणाऱ्या व्यक्तींची शोधमोहीम व तपासणी अद्यापही सुरू असून, यापैकी ९५ संशयित व्यक्तींचे स्वॅब मंगळवारी (ता.१४) घेतले. तसेच एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ६८ वर पोचली आहे. यामुळे शहराची वाटचाल कोरोना ‘हॉटस्पॉट’कडे होत आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, सोमवारी (ता.१३) रोजी रॅपिड अँटिजेंन टेस्टच्या माध्यमातून संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली. यामध्ये शहरातील ६७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. रॅपिड अँटिजेन टेस्ट किटच्या तुटवड्यामुळे पुन्हा संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यास आरोग्य प्रशासनाने सुरवात केली असून, (ता.१४) एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्‍त झाला असून, ९५ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. शहरातील कोरोना ६८ कोरोनाबाधितांपैकी ४१ व्यक्ती गंगाखेड येथे उपचार घेत असून, उर्वरित कोरोनाबाधितांना परभणी, नांदेड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा आलेख पाहता गंगाखेड शहराने कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल केल्याची प्रचिती शहरवासीयांसह सर्वांनाच येत आहे. 
 
परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - २९०
आजचे पॉझिटिव्ह - आठ
उपचार सुरू - १४४
उपचार घेत घरी परतले - १३८
एकूण मृत्यू - आठ 
आजचे मृत्यू - शून्य

(संपादन ः राजन मंगरुळकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; Three in Parbhani, two in Selu and one each in Sonpeth, Pathri and Jintur, Parbhani news