कोरोना इफेक्ट : फुलांचे झाले अश्रू 

सुरेश रोकडे 
Friday, 27 March 2020

बीड जिल्ह्यातील सतत दुष्काळाने ग्रासलेल्या भागात काहीतरी बदल पारंपरिक शेतीऐवजी वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. कमी पाणी असतानाही ठिबकच्या जोरावर फळ, फूल, भाजीपाला शेतीकडे शेतकरी वळले आहेत;

नेकनूर (जि. बीड) -  वसंत कानेटकर लिखित 'अश्रूंची झाली फुले 'हे गाजलेले नाटक सर्वांनाच माहीत आहे. दुःखानंतर येणारे सुख व त्यानंतर निघणारे आनंदाश्रू म्हणजे एक प्रकारची फुले असतात; पण कोरोना विषाणूचा परिणाम फूलशेतीवरही झाल्याने या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रूच निघत आहेत. 

बीड जिल्ह्यातील सतत दुष्काळाने ग्रासलेल्या भागात काहीतरी बदल पारंपरिक शेतीऐवजी वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. कमी पाणी असतानाही ठिबकच्या जोरावर फळ, फूल, भाजीपाला शेतीकडे शेतकरी वळले आहेत; पण वातावरण, बाजारभाव अशा चक्रात शेतकरी नेहमीच अडकतात. त्यातच भरीस भर म्हणून कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यातील फुलशेती करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे येथील संदीपान वाघमारे यांनी भाजीपाल्याची शेती करत असतानाच जानेवारीच्या सुरवातीला आपल्या एक एकर शेतात ४० हजार रुपये खर्च करून १५ हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली. त्याचबरोबर लागवड, खते-औषधे असे मिळून जवळपास साठ हजारांच्या आसपास खर्च झाला.

कष्ट केले, पाणी दिले, मार्चच्या सुरवातीला फुलशेती बहरली. अगदी डोळ्यांचे पारणे फिटावे असे मोठमोठी झेंडची फुले तयार झाली. गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे यावर्षी काही ना काही पदरात पडेल अशी आशा असतानाच सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत गेला. मंदिरे बंद झाली, लग्नसमारंभ व इतर समारंभही बंद झाले. त्यामुळे आता या फुलांचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जर काही दिवसांत फुलांची विक्री नाही झाली, तर फुले जागेवर वाळून जातील व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

एकंदरीत काय तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, सततचा दुष्काळ, अतिवृष्टी व कवडीमोल मिळणारा बाजारभाव यामुळे शेतकरी हैराण झालेला असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका फुलशेतीलाही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून टाकले आहे. त्यामुळेच फुलांचे झाले अश्रू असेच म्हणावे लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect: Flower prices fall