esakal | भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह कुटूंबातील सदस्यांना कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला असल्याची बाब उघड झाली आहे. सध्या त्या पुणे येथे उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांना देखील कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे.

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह कुटूंबातील सदस्यांना कोरोना

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला असल्याची बाब उघड झाली आहे. सध्या त्या पुणे येथे उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांना देखील कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे.

भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर या सातत्याने मतदारसंघातील कामासाठी दौरे करत होत्या. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु झालेला नसतांना आमदार मेघना बोर्डीकर यांनी दौरे टाळले होते. परंतू, नंतर मतदार संघातील लोकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता त्यांनी गावनिहाय दौरे सुरु केले होते. जिंतूर व सेलू तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांच्या अडीअडणीसाठी त्या सातत्याने धावत होत्या. अतिवृष्ठी झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी घेवून त्या मुंबईत कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेण्यासाठी देखील गेल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांच्या घरी पुणे येथे परत आल्या. त्या ठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांच्यासह त्याच्या कुटूंबातील इतर सात सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात आजपर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार तथा माजी मंत्री प्रा.फौजिया खान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर औरंगाबाद तर खासदार फौजिया खान यांच्यावर त्यांच्या परभणी येथील निवासस्थानीच उपचार करण्यात आले. हे दोघेही कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा - वा...रे पठ्ठ्या : पोलिसालाच जीवे मारण्याची धमकी, नांदेडातील घटना

जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे सरकली आहे. मृताचा आकडा देखील शंभरी पार करण्याची शक्यता आहे. कोरोनावर मात करून घरी परत येणाऱ्यांची संख्या आठशेच्या जवळपास गेली आहे. परभणी शहरातील रॅपिड अॅन्टीजन टेस्टमध्ये दररोज अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने दररोज ही चाचणी व्यापारी, विक्रेते व इतरांसाठी सक्तीची केली आहे.

हेही वाचा - परभणी कारागृहात कोरोनाचा शिरकाव, ८४ कैद्यांना लागन

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये
मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कुणीही गर्दीच्या ठिकाणी जावू नये किंवा विनाकारण एकत्र जमू नये. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून आपण निश्चित यावर विजय मिळवू. 
- मेघना बोर्डीकर, आमदार, भाजप

संपादन ः राजन मंगरुळकर