
परभणीत लस घेऊन आलेल्या व्हॅनचे स्वागत करण्यात आले. या वेळी दीपक मुगळीकर, डॉ. संजय कुंडेटकर, डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ. शंकरराव देशमुख, डॉ. किशोर सुरवसे, डॉ. जि.के. सुरसुलवाड, मंगला खिस्ते, कैलास सोमवंशी.
परभणी ः कोरोनापासून बचाव करणारी संजिवनी अर्थात कोरोनाची लस बुधवारी (ता.१३) परभणीत दाखल झाली. पहिल्या टप्प्यात नऊ हजार ३३० डोसचा साठा आला असून त्यातून फ्रंटलाईनवर काम करणारे आरोग्य क्षेत्रातील सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना ही लस शनिवार (ता.१६) पासून दिली जाणार आहे.
वाहनाचे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत
परभणी येथे बुधवारी (ता.१३) ही लस औरंगाबाद येथून आणण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता लसीचे व्हॅक्सीन घेवून ही मुख्य औषध निर्माण अधिकारी मंगला खिस्ते या परभणीत दाखल झाल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाठीमागे असलेल्या शितगृहात ही लस आणण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते लस घेवून आलेल्या वाहनाचे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, माता व बाल संगोपन अधिकारी जी.के.
सीरसुडवाड, माहिती अधिकारी विनोद रापतवार, आरोग्य विभागातील कैलास सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
नऊ हजार ३३० डोसचा साठा उपलब्ध
जिल्ह्यात सुरुवातीला फ्रंन्टलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात लस देण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यांना शनिवारी लस दिली जाणार असल्याचे एसएमएस मोबाईलद्वारे पाठविण्यात आलेले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील तीन सेंटरवर प्रत्येकी शंभर या प्रमाणे लस दिली जाणार आहे.
हेही वाचा - मूकबधिर युवतीवर बलात्कारानंतर खून करणाऱ्या दोघांना कोठडी- पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे
लसीकरणासाठी तीन सेंटर ; १५ कर्मचारी
शनिवारी, ता. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय व महापालिकेचे रुग्णालय अश्या तीन सेंटरवर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी प्रत्येक सेंटरमध्ये आरोग्य विभागातील पाच प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत.
दहा हजार ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी
जिल्ह्यातील दहा हजार ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. त्यांच्यासाठी नऊ हजार ३३० डोस प्राप्त झाले आहेत. हे डोस सध्या जिल्हा लस भांडारमध्ये ३.३ डिग्री सेल्सीअस इतक्या तापमानावर ठेवण्यात आले आहे. १६ जानेवारीच्या लसीकरणासाठी गुरुवारी महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली जाणार आहे,
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी
संपादन ः राजन मंगरुळकर