
शनिवारी (ता. १६) येथील जिल्हा रुग्णालयात शंभर तसेच कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शंभर अशा एकूण दोनशे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १६) येथील जिल्हा रुग्णालयात शंभर तसेच कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शंभर अशा एकूण दोनशे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे .
जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. शनिवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालय या दोन केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक तसेच परिचारिकांना ही लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात सरासरी ८२.२३ टक्के मतदान, सोमवारी मतमोजणी
लसीकरण शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात सहा हजार ६५० कोरोना लस उपलब्ध झाली असून कोविन अँपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना तीचे वाटप केले जाणार आहे. तसेच टप्पटप्याने ही लस जिल्ह्यात दिली जाणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. टापरे यांनी सांगितले.
संपादन- प्रल्हाद कांबळे