coronavirus - तबलिगींच्या संपर्कातील बीड पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून राज्यासमोर दिशादर्शक पॅटर्न ठेवणाऱ्या बीडकरांची दोन दिवस ‘त्या’ तबलिगींमुळे वाढलेली हृदयाची धडधड अखेर सोमवारी (ता. सहा) सायंकाळी शांत झाली. तबलिगींच्या संपर्कात आलेल्या २९ पोलिसांसह इतर पाच अशा ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी करून बीडने राज्यासमोर दिशादर्शक पॅटर्न ठेवला आहे. संचारबंदी, जमावबंदी व लॉकडाऊन आदी आदेशांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होत आहे. उल्लंघन केल्याचे आतापर्यंत ६६८ जणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. सर्वाधिक स्थलांतरित असलेल्या जिल्ह्यात १४ चेकपोस्टवर बाहेरून येणाऱ्या ६० हजारांची पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्यविषयक व प्रवासविषयक माहिती घेण्याचा पॅटर्नही जिल्ह्यातच राबविला. गावपातळीवरही बाहेरून आलेल्यांचे फेरसर्वेक्षण आणि गरजेनुसार आरोग्य तपासणी करण्यात आली.

संचारबंदीत शिथिलतेची सर्वांत कमी वेळही जिल्ह्यातच ठेवली गेली. परिसरातील जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाही रविवारपर्यंत (ता. पाच) जिल्हा शून्यावर होता; परंतु तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या १२ जणांपैकी आठजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांचा बीडच्या २९ पोलिसांशी संपर्क आल्याचे समोर आले. या पोलिसांना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. जालनाहून लातूरकडे जाताना या तबलिगींना बीड पोलिसांनी शहागड चेकपोस्टवर अडविले होते. त्यावेळी तबलिगींनी पोलिसांशी हुज्जतही घातली होती. त्यामुळे बीड मुक्कामाचा बेत फसून हे तबलिगी शहागड येथे मुक्कामी राहिले व नंतर दुसऱ्या मार्गे लातूरकडे रवाना होत असताना पुन्हा त्यांना चौसाळा चेकपोस्टवर अडविले. 

या दोन ठिकाणी २९ पोलिसांसह या पथकातील चार इतर कर्मचाऱ्यांचा तबलिगींशी संपर्क आला होता. त्यामुळे शून्यावर असलेल्या बीडकरांची काळजी वाढली होती. रविवार सायंकाळपासून काळजीत असलेल्या बीडकरांचा सोमवारी सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जीव भांड्यात पडला. दरम्यान, विलगीकरण कक्षातील या पोलिसांना आता घरी पाठवून १४ दिवस होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 

आतापर्यंत ९८ नमुन्यांची तपासणी 
जिल्ह्यात आतापर्यंत ९८ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्वाधिक ३४ नमुने पाठविण्याची रविवारची पहिलीच वेळ होती. आतापर्यंत ११३ लोक परदेशातून आले असून सद्यःस्थितीत १४ जण होम क्वारंटाइन आहेत. तर बाहेरजिल्ह्यांतून आलेल्या ३२ जणांना होम क्वारंटाइन केलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com