Coronavirus Impact : इंजिनिअरिंग, वेल्डिंग व्यवसायांवर संक्रांत

कमलेश जाब्रस
Saturday, 20 June 2020

  • बेरोजारीचे संकट
  • शेती अवजारे तयार
  • ग्राहकच नाही 

माजलगाव (जि. बीड) : खरीप हंगामाच्या सुरवातीला लागणारे वखर, तिफण, बैलगाडी तर ऊस वाहतुकीसाठी लागणारे टायर कारागिरांनी तयार केले आहेत; पण इंजिनिअरिंग, वेल्डिंग व्यवसायावर यंदा कोरोनामुळे संक्रांत आली असून, तयार केलेले शेती अवजारे, ट्रॅक्टर ट्रॉली विक्रीविना धूळखात आहे. आर्थिक टंचाई असल्याने उपलब्ध असलेल्या वस्तूंवर किंवा उसनवारी
करून हे वर्ष काढण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. 

यंदा शहरातील इंजिनिअरिंग वर्क्स दुकानदारांनी कठीण काळातही खरिपाची तयारी केली आहे; परंतु यावर्षी कोविड-१९ मुळे लॉकडाउन झाले. त्यामुळे त्यांनी तयार करून करून ठेवलेली बैलगाडी, वखर, तिफण, खत पेरणी यंत्र, हळद कुकर व ड्रम, कोळपे, लेझर वखर, तिरी पंजी, मोगडा ही लोखंडी अवजारे तयार करून ठेवली; परंतु ती विक्रीच झाली नाहीत. परिणामी,
त्यांनी केलेली मेहनत व केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे. 

कोविड करतोय कामगारांचा घात, चतृर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कोरोनाचा कहर...  

 

अडीच ते तीन महिन्यांपासून कच्चा माल मिळाला नाही. त्यामुळे नवीन साधननिर्मिती बंद झाली. आहे त्या साधनसामग्रीवर जे साहित्य तयार केले त्यांची विक्री झाली नाही. आर्थिक नियोजन कोलमडले असून, २०२० हे वर्ष बेरोजगारीतच जाणार आहे. 
- नारायण माने, व्यावसायिक. 
 

साडेतीन, चार, पाच फूट अंतरासाठी आधुनिक पद्धतीने वखर व तिफण तयार केली. ती आज शेतकऱ्यांना शेती कामी सोयीची ठरत आहे. यातून चांगले उत्पन्न होत होते; परंतु यावर्षी कोरोनामुळे या साधनांची विक्री ठप्प झाली आहे. तीन महिन्यांपासून काम नाही. ग्राहक नाही आणि दामही नाही. 
- गोपाळ जाधव, व्यावसायिक. 

  
मागील तीन ते चार वर्षांपासून इंजिनिअरिंग वर्क्स, वेल्डिंगचा व्यवसाय करीत शेतकऱ्यांना कमी दरात शेतीसाठीची अवजारे, ऊस वाहतुकीचे टायर, ट्रेलर बनवून दिले. यातून चांगला रोजगारही उपलब्ध झाला. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत व्यवसाय लॉक झाला आहे. टाळेबंदी संपूनही चांगला व्यवसाय कधी सुरू होईल याची प्रतीक्षाच आहे. 
- रघुनाथ शिंदे, व्यावसायिक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Impact on Market