Coronavirus -पिंपळ्यातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहाजणांवर नजर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

बीड जिल्ह्यात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तिघे व अन्य तिघे अशा सहाजणांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

आष्टी (जि. बीड) - स्थलांतरितांची प्रचंड संख्या असूनही कोरोना साथीपासून दूर राहिलेल्या बीड जिल्ह्यात आज तालुक्यातील पिंपळा येथील रुग्णाच्या रूपाने पहिला कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तिघे व अन्य तिघे अशा सहाजणांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

पिंपळा हे गाव आष्टी तालुक्यात असले तरी नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. नगर शहरातील आलमगीर परिसरात राहणाऱ्या आपल्या जावयाला तबलिगी जमातीवरून परतल्याने भेटण्यासाठी म्हणून पिंपळ्यातील ही पन्नासवर्षीय व्यक्ती गेली होती. तेथे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. चार दिवसांपूर्वी ही व्यक्ती गावात परतली. 

ही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

दरम्यान, ही व्यक्ती पिंपळा येथे किराणा दुकान चालवत होती. परंतु दोन महिन्यांपासून हे दुकान बंद ठेवण्यात आले असल्याचे पुढे आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. परंतु या कोरोनाबाधिताच्या सहवासात कुटुंबातील तिघे व इतर तिघे असे सहाजण आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे प्रशासनाचे डोळे लागले आहेत. तसेच इतरही कोणी या व्यक्तींच्या संपर्कात आलेला आहे का, याचीही चाचपणी प्रशासन करीत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus - Look at the six people in contact