Cotton Price Update : कापसाच्या भाववाढीची अपेक्षा मावळली!

ना इलाजाने पहिल्या थप्पीचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात, हंगाम आटोपता झाला तरी शासकीय खरेदी केद्रे बंदच
cotton price update farmer cotton producer in trouble due to no hike in cotton
cotton price update farmer cotton producer in trouble due to no hike in cottonSakal

पाचोड : भाववाढीची अपेक्षा व निसर्गाच्या विविध लहरीपणाने होरपळलेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना आठ महिन्यापासून घरांत साठविलेला पहिल्याच वेचणीचा कापूस नाइलाजाने तोटा सहन करत व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत असून हंगाम आटोपता झाला तरी अद्यापही शासकीय कापुस संकलन केंद्रे सुरु न झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय राहीला नाही.

एवढेच नव्हे तर बाजारासह गावागावांत व्यापारी रस्त्या- बोळ्यात काटे उभारून कापसाची खरेदी करीत आहे. तुर्तास साठवून ठेवलेल्या पहिल्या वेचणीच्या कापसाला प्रती क्विटल सात ते साडेसात हजार रुपये तर फरदड कापसाला प्रति क्विंटल पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत असुन व्यापारीवर्ग पाण्यावर लोणी काढुन आपली वरकमाई करीत असल्याचे पाहवयास मिळते.

एकंदरीत सप्टेंबर महिन्यापासून शेतातून कापसाचे उत्पादन निघण्यास सुरवात झाली. सुरवातीला कापसाला नऊ हजार आठशे रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बारा हजाराची अपेक्षा ठेवली होती.

त्यानंतर झपाट्याने यांत उतार येऊन कापुस चक्क आठ हजार आठशे रुपयांवर आला. आज ना उद्या भाव वाढेल या भाबड्या आशेवर शेतकऱ्यांनी आपला कापुस घरांतच थप्पीला लावून ठेवला. केवळ भाववाढीच्या अपेक्षेवर मागील वर्षाच्या कापसासह यंदाचाही आठ महिन्यापासून कापुस घरात थप्पीला लागून आहे.

मात्र भाववाढ होण्याऐवजी भावात दिवसेदिवस कमालीची घसरण होत आहे.एकंदरीत आठवडे बाजारासह गावागावांत शेंगदाण्याच्या पुड्या विकल्या जाव्यात त्याप्रमाणे कापुस विक्री करुन कापूस उत्पादक आपल्या गरजांची पुर्तता करीत असल्याचे चित्र चौफेर पाहावयास मिळते.

गेल्या आठ दहा वर्षापासून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना यंदा वरुणराजाने वेळेवर व दमदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला व नंतर पावसाने कायमचीच उघडिप दिल्याने भारी व काळीच्या जमिनीतील पिके वगळता सर्व क्षेत्रावरील पिके वायाला गेली,

हलक्या व मुरमाड जमिनीवरील केवळ तीस टक्के कापसासह खरिपाची पिके तरली. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नाऐवजी निराशाच पदरी आली. त्यातच 'लाल्या'चा प्रार्दूभाव होऊन तालुक्यातील दहा मंडळांतर्गत ५७ हजार ५०९ हेक्टरवरील कापसाचे पिक संकटात सापडले.

प्रथमच चौदा वर्षानंतर दसऱ्याला पूजेसाठी “सकुना”चा कापूस घरात येण्यास प्रारंभ होण्यापूर्वीच कापसाच्या उभ्या झाडावरच वाती झाल्या. दसऱ्याला सुरु होणारी तालुक्यातील शासकीय कापूस संकलन केंद्रे हंगाम आटोपता झाला तरी अद्यापपावेतो सुरू झाली नाहीत. कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे परराज्यातील व्यापाऱ्याकडे लागले होते.

परंतु स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वत: चे काटे उभारून आठवडे बाजारासह गावोगावी कापूस खरेदीचा सपाटा सुरु केल्याने व भावात तेजी येत नसल्याने परराज्यातील व्यापाऱ्यांनी येणे टाळले. कापुस वेचणीचा दर शेतकऱ्यांसह मजुरांना परवडला नसला तरी बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

सिंचनाची पर्यायी व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना फरदड कापसाचा मोह आवरता आवरेना. ते अजुनही कापसाला पाणी देण्यासोबतच खतांची मात्रा देत उत्पन्न घेण्यावर भर देत आहे. काहीनी कापसाचे पीक उपटून ज्वारी, हरभरा, गहू पेरणीची लगीनघाई करीत दुसाटा साधून घेतला.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाचा हंगाम आटोपता झाला असला तरी, अद्यापपावेतो पाचोडसह पैठण, बालानगर, निलजगाव, लोहगाव, विहामांडवा, बिडकीन येथील शासकीय कापूस संकलन केंद्रे बंद आहेत.

शासन कापुस उत्पादकाकडून पाच टक्केे (वस्तुसेवा कर) जीएसटी शुल्क आकारणार असल्याचा धाक दाखवून व्यापारीवर्ग आपले उखळ पांढरे करून घेतांना दिसत आहे.दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतकरी श्रमातून पिकविलेला आपला कापूस व्यापाऱ्यांना विकून आपल्या गरजांची पूर्तता करीत आहेत.

कापसाची आवक जेमतेम असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने यंदा कापसाचे आगार म्हणून परिचित असलेल्या पैठण तालुक्यातील कापूस काळवंडल्याचे चित्र पाहावयास मिळते. पाचोड येथे स्थानिक व्यापाऱ्यासह परराज्यातील व्यापाऱ्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून महा मार्गालगत उभारलेल्या दहा ते बारा जिनिंग प्रेसिंग अलीकडील काळात शेवटच्या घटका मोजत आहे.

शेतकर्‍यानी भाववाढीच्या अपेक्षेने आठ महिन्यापासून घरात कापूस साठवुन ठेवल्याने वजनातही कमालीची घट झाली. सोबतच खाज, ॲलर्जीचा त्यांना मुकाबला करावा लागत आहे. घराला गोडावुनचे स्वरूप आले असून आता भाव वाढण्याची सुचिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीचा ठेवलेला थप्पीचा कापूस व्यापाऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे .

प्रभाकर सुकासे (शेतकरी, वडजी) :'यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने पाठ फिरविल्याने खरिप हंगामाची वाट लागली. बी-बियाणे, खते, औषधी व मशागतीवरील खर्चही पदरी पडला नाही. सावकराचे देणी, उधार -उसनवारी कशी फेडावी अन् पुढील हंगामात शेती कशी कसावी या चिंतेने झोप उडाली आहे. आठ महिने भाववाढीच्या अपेक्षेने घरांत ठेवलेला कापुस व्यापार्‍याला दिल्याखेरीज पर्याय नाही.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com