
परभणी : बोंडअळीला रोखण्यासाठी वेळेआधी कपाशीची लागवड होऊ नये यासाठी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांना एक जूननंतरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी कापूस लागवडीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्यात सोयाबीनपाठोपाठ सर्वाधिक कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामातील कापूस हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. आता हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे वाढत आहे. जून महिन्यात मान्सूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पावसावर कापसाची लागवड केली जाते. परंतु, अलीकडे काही वर्षांपासून बागायतदार शेतकरी मेअखेरीस कापसाची पूर्वहंगामी लागवड करत आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी उत्पादनवाढीसाठी कापसाची पूर्वहंगामी लागवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. ता. १५ मेपासून अशा कपाशीची लागवड केली जात होती. सुरवातीची एक ते दोन वर्षे हा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, पुढे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. तसेच ऐन उन्हाळ्यात लागवड केलेल्या कपाशीची वाढ व्यवस्थित न होणे, करपणे असे प्रकार होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच ही लागवड बोंडअळीसाठी पोषक ठरू लागल्याने गतवर्षीपासून मे महिन्यातील लागवड रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहेत.
हेही वाचा : सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्यापुर्वी तपासा- वनामकृविचा सल्ला
११ लाख ५५ हजार पाकिटांची मागणी
दोन वर्षांत बोंडअळीचे प्रमाण वाढल्याने पूर्वहंगामी केलेली लागवडदेखील धोक्यात येऊ लागली. बोंडअळी व्यवस्थापन करण्यात अडचणी येत असल्याने हंगामातच लागवड करण्याच्या सूचना सातत्याने शास्त्रज्ञ व कृषी विभाग करत आहे. तरीदेखील काही शेतकरी अशी पूर्वहंगामी लागवड करून नुकसानीस बळी पडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनानेच कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांना जून महिन्यात देण्याचे नियोजन केले आहे. त्यापूर्वी विक्रेत्यांना २० मेनंतर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, त्यांना पुढील सूचना आल्याशिवाय बियाणे आताच विकता येणार नाही. जिल्ह्यासाठी २०२० च्या खरीप हंगामात दोन लाख दहा हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी ११ लाख ५५ हजार कपाशी बियाणाच्या पाकिटांची मागणी केली आहे, अशी माहीती श्री. ममदे यांनी दिली आहे.
जूनमध्ये कापूस लागवड करा
शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई न करता मान्सूचा चांगला पाऊस पडल्यानंतर अर्थात जून महिन्यातच कापूस लागवड करावी. तसेच अन्य पिकांची पेरणी करताना शक्य असल्यास घरचे बियाणे वापरावे.
- हनुमंत ममदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.