येथील नगरसेवक झाले आक्रमक...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. २२) महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मुलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी करत प्रशासन आणि अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले.

नांदेड ः एक ना अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे आणि त्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाला जमत नसल्याने नांदेडकर नगरसेवकांवर नाराज होत आहेत. त्यामुळे शेवटी नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. २२) महापालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मुलभूत सोयीसुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी करत प्रशासन आणि अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले.

महापालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहात दुपारी तीन वाजता महापौर दीक्षा धबाले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरवात झाली. सुरवातीला सहायक आयुक्त संजय जाधव यांना लिव्हर दान करणारी त्यांची मुलगी अंकिता जाधव हिने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक करत तिचा सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये सिडको हडकोसह इतर भागातील अनियमित पाणीपुरवठा, विविध भागात करण्यात येत असलेले वृक्षारोपण, हॉकर्स झोनची अंमलबजावणी, मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त, अनेक भागात बंद असलेले पथदिवे, ड्रेनेजवर झाकणे बसविण्यात आली नाहीत, रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत या व इतर विषयांवर जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर अनेक अधिकारी आणि कर्मचारी नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, वेळेवर उत्तरे देत नाहीत, अशा तक्रारीही करण्यात आल्या. 

या सभेत २५ प्रस्तावांवर चर्चा झाली आणि ते मंजूर करण्यात आले. शिपाई पदावर असलेल्या सय्यद जिलानी यांना वैद्यकीय आर्थिक मदत करण्यावरून नगरसेवक आणि प्रशासनात बराच वेळ खडाजंगी झाली. नगरसेवकांनी या बाबत महापौरांच्या समोरील जागेवर ठिय्या मारून आंदोलन केले. अखेर प्रशासनाने या बाबत शासनाच्या सुचनेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले. महात्मा फुले यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या जागेचा मुद्दा श्री. गजभारे यांनी उपस्थित करून त्यावरून आयुक्त व प्रशासनाला जाब विचारला. त्यांचे आरोप आयुक्तांनी खोडून काढण्याचा प्रयत्न करून या संदर्भात कार्यवाही करण्याचेही आश्वासन दिले. या वेळी आयुक्त लहुराज माळी, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू, स्थायी समितीचे सभापती फारूख अली खान यांच्यासह आजी - माजी पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

महापालिकेला येणार अच्छे दिन
शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर आमदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव बापूराव गजभारे यांनी मांडला. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे व जिल्ह्यातील इतर सर्व नूतन आमदारांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी माजी महापौर अब्दुल सत्तार तसेच इतरांनी स्वागत केले, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन होणार असल्यामुळे आता नांदेड महापालिकेला अच्छे दिन येतील, असा विश्वास माजी महापौर सत्तार यांनी व्यक्त केला.

फुले मार्केट विकसित करणार
महात्मा फुले मार्केट विकसित करण्यासंदर्भातील ठरावावर चर्चा करून तो मंजूर करण्यात आला व त्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. या बाबत सन्मान बिल्डकॉन आणि शारदा कन्स्ट्‍क्शनच्या निविदा आल्या होत्या. त्यामध्ये वाटाघाटी करून सन्मान बिल्डकॉन यांची निविदा मंजूर करून अंतिम करण्यात आली. त्यांची १३ कोटी दहा लाख ४० हजार रुपयांची निविदा सभेत मंजूर करण्यात आली. या ठिकाणी वाहनतळ, भाजीपाला मार्केट, ग्रंथालयासह व्यापारी संकुल होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Councilors here have become aggressive ...