लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे २५७ रुग्णांचा मृत्यू, २१५ जणांना विविध आजार

हरि तुगावकर
Monday, 31 August 2020

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढ आहे. यात विविध आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक बळी जाताना दिसत आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. २९) २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ रुग्णांना विविध आजार होते.

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढ आहे. यात विविध आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक बळी जाताना दिसत आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. २९) २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ रुग्णांना विविध आजार होते. एकूण मृत्यूमध्ये ७० वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १०२ इतकी आहे. सध्याही कोरोनाचे संकट सुरूच आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोविडच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत रोज सरासरी पाच ते सातजणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात २१५ जणांना विविध आजार होते. हे आजार व त्यात कोरोनाची लागण याचा परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत फक्त ४२ जणांचा आजार नसताना मृत्यू झाला आहे; पण त्यातही अनेकजण उशिराने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत.

धक्कादायक : सतत रडत असल्याने मामाने केला तेरा दिवसांच्या भाचीचा खून

मृत्यूमध्ये सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या १०२, साठ वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ८४, ५० वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या ४२, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या २९ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचाच अधिक मृत्यू होत आहे; तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही यात समावेश आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे विविध आजार असलेले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-------रुग्णालयात किती दिवस उपचार झाले
२८---------------------------------एक दिवसापेक्षा कमी
१४२-------------------------एक ते पाच दिवस
५४------------------------पाच ते दहा दिवस
३० -------------------दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस

 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Take Lives Of 257 Patients In Latur District