
शेतकरी दांपत्याची आत्महत्या
सुखापुरी : वडीकाळ्या येथील एका शेतकरी दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.२७) सकाळी उघडकीस आली. संजय भाऊराव ढेबे (वय ४५) आणि संगीता संजय ढेबे (३८) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, त्यांनी कर्जामुळे हे टोकाचे पाऊस उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले. ढेबे दांपत्य पहाटेच झोपेतून उठते. पण, शनिवारी ते घरातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या सिंधूबाई श्यामराव ढेबे यांनी पहाटे सहा वाजताच्या सुमारास खिडकीतून डोकावून पाहिले. यावेळी संजय आणि संगीता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्यानंतर सिंधूबाई यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिस पाटील राजेंद्र गाडेकर, सरपंच भगवान ढेबे आणि उपसरपंच रमेश काळे यांना दिली. गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक लंके, कर्मचारी मदन गायकवाड, बाबासाहेब पठाडे आणि गणेश मुंडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
घरी होते दोघेच
शुक्रवारी पोळा साजरा केल्यानंतर हे दांपत्य गावातील घरी थांबले. दरम्यान, आजी-आजोबा शेतातील आखाड्यावर राहत असल्याने त्यांचा मुलगा शेतात झोपण्यासाठी गेला होता. त्यामुळे घरी संजय आणि संगीता हे दोघेच होते. या दांपत्याला एक विवाहित मुलगीसुद्धा आहे.