मुसळधार पावसाने पिके भुईसपाट, खरिपाच्या भरवशावरचे नियोजन पाण्यात 

pani el
pani el

वसमत : तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावासाची मुसळधार सुरू असल्याने शेतीपिके भुईसपाट झाली आहेत. शुक्रवार (ता.१८) सकाळी तीनपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वच नद्या क्षमतेपेक्षा जास्त वाहू लागल्या. नांदेडकडून वाहणाऱ्या आसना नदीला महापुराचे स्वरूप होते. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी घुसून हळद, सोयाबीन, ऊस, कापूस पीक उद्ध्वस्त झाले. खरिपाच्या भरवशावर केलेले आर्थिक नियोजन काही तासांत बिघडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आता महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

यापूर्वीच हाती आलेला मूग, उडिदाचे पावसाच्या कहराने मोठे नुकसान झाले. यानंतर नगदी व भरवशाचे पीक असलेले सोयाबीन काढणीला आले होते. ढगाळ वातावरण गेले की कापून व मळणी करून बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत शेतकरी होते; परंतु मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने तोडणीला आलेले सोयाबीन शेतात साचलेल्या पाण्यात झोपले. परिणामी वाळलेल्या शेंगाला जाग्यावरच अंकुर निघाले आहेत. त्यातच शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने तर कहरच माजवला. सर्वच नद्या, नाले क्षमतेपेक्षा जास्त वाहत आहेत. यात नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने सोयाबीनसह ऊस, हळद, कापूस, ज्वारी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरले आहे. तालुक्यातील आसेगाव येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली आहे. निवेदनावर अमोल मुळे, पुरभाजी मुळे, सखाराम काळे, शिवदास भालेराव, जगन्नाथ कल्याणकर, देवानंद भालेराव, केदार कानोडे, महारुद्र स्वामी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

संततधार पावसाने सोयाबीनच्या उभ्या पिकाला फुटले मोड 
हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश भागात उडीद, मूग याप्रमाणे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला मोड फुटले आहेत.  सोयाबीनला लागलेल्या शेंगामधून मोड निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, तर काही भागात सोयाबीनची वाढ झाली; पण धुक्यामुळे फुलगळ झाल्यामुळे सोयाबीन झाडाच्या नुसत्या काड्या उभ्या आहेत. जी परिस्थिती सोयाबीन तीच परिस्थिती ज्वारी, हॅब्रिड, कपाशी, हळद पिकांची आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर कधी निसर्गाचा लहरीपणा उठतो तर कधी हाती आलेल्या पिकाला भाव मिळत नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 


दोन लाख ५८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी 
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसाचा फटका पिकांना बसला आहे. मध्यतरी पावसाने ओढ दिल्याने पिकांना पावसाची आवश्यकता होती. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला मोड फुटल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात तीन लाख ८० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे, तर दोन लाख ५८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे. 


गिरगाव येथील शेतकरी अडचणीत 
गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून सोयाबीनला मोड फुटले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गिरगावसह परिसरातील परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्ड बुदुक, डिग्रस खुर्द या गावांत रविवारपासून मुसळधार पाऊस पडला असून अतिवृष्टी झाली. यात ऊस, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यात सोयाबीन पीक आता पंधरा दिवसांत काढणीस आले होते. बऱ्यापैकी शेंगा लागल्या होत्या. यामुळे शेतकरी समाधानी होते; पण मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांना मोड फुटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. मूग, उडीदसुद्धा शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यात सोयाबीनची आशा होती; पण हेसुद्धा मोड फुटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com