esakal | वीस वर्ष देशासाठी जगले, आता जगायचे होते कुटुंबासाठी, पण त्यांच्यावर काळानेच घाला घातला
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF jawan Bibhishan Sirsat

देशसेवेसाठी जाण्यास निघालेल्या जवानांचा अपघाती मृत्यू झाला. बिभीषण सिरसाट सीआरपीएफमध्ये नोकरीला होते. मंगळवारी (ता.२५) ऑगस्ट रोजी नातेवाईकांना भेटून देशसेवेसाठी जातांना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे तांदळा गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे .

वीस वर्ष देशासाठी जगले, आता जगायचे होते कुटुंबासाठी, पण त्यांच्यावर काळानेच घाला घातला

sakal_logo
By
वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड) : देशसेवेसाठी जाण्यास निघालेल्या जवानांचा अपघाती मृत्यू झाला. बिभीषण सिरसाट सीआरपीएफमध्ये नोकरीला होते. मंगळवारी (ता.२५) ऑगस्ट रोजी नातेवाईकांना भेटून देशसेवेसाठी जातांना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे तांदळा गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे .

गेवराई तालुक्यातील तांदळा गावचे भूमिपुत्र बिभीषण सीताराम सिरसाट हे २००० साली सीआरपीएफ मध्ये रुजू झाले होते. देशाच्या विविध भागात त्यांनी वीस वर्ष कर्तव्य बजावले आहे. मार्च महिन्यात ते रजेवर गावी आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे गावाकडेच अडकून पडले होते. गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांना कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश आले. त्यामुळे मंगळवारी ते रुजू होण्यासाठी निघाले होते. तांदळा येथून चारचाकी वाहनाने ते नगर येथे जाणार होते. 

तत्पूर्वी नातेवाईकांना भेटून गावाकडे जात असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर साठेवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती निधनाने तांदळा गावावर शोककळा पसरली असून जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर तांदळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले, आई-वडील असा परिवार आहे.

बिभीषण सिरसाट यांनी वीस वर्ष कर्तव्ये बजावल्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती दोन महिन्यात होणार होती. पेन्शनसाठी लागणारे सर्व कागदपत्रे त्यांनी ग्रामपंचायत व इतर ठिकाणाहून जमा केली होती. परंतु ते कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने गावाकडेच अडकून राहिले. त्यामुळे सेवानिवृत्तीचा कार्यकाळ देखील वाढला होता. दरम्यान सेवेत रुजू होण्याचे आदेश आल्यानंतर देशसेवेसाठी जात असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

संपादन-सुस्मिता वडतिले