चाकूरजवळील अपघातात सीआरपीएफचा जवान ठार

प्रशांत शेटे 
बुधवार, 22 मे 2019

लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी येत होते.

चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. 

लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी येत होते. सीआरपीएफच्या के. एल. २२ बी ८३८७ क्रमांकाच्या जीपमध्ये हे जवान येत असताना आष्टामोड जवळील रेल्वे स्थानकाच्या समोरील वळण रस्त्यावर एम. एच. ३८ एफ ५३३३ क्रमांकाच्या ट्रव्हल्सने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चालक जितेंद्र चौधरी यांचा मृत्यु झाला तर सहाय्यक कमाडंट गंभीरसिंग यांच्या डोक्यास मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत, दुसरे जवान देशमुख हे ही जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिका व दोन डाॅक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचून जखमींना लातूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crpf jawan dead in accident near latur