esakal | जिंतूरमध्ये संचारबंदीच्या चिंधड्या; मागच्या दाराने व्यवसाय करणे भोवले

बोलून बातमी शोधा

जिंतूर दुकानदरावर कारवाई
जिंतूरमध्ये संचारबंदीच्या चिंधड्या; मागच्या दाराने व्यवसाय करणे भोवले
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : कडक संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आदेश असतांनाही मागच्या दाराने उघडपणे व्यवसाय करुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील दोन प्रतिष्ठित कापड व्यापाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गुरुवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास सिनेस्टाईल धडक कारवाई करुन त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना रुग्णांचा आकडा सर्वांच्याच चिंतेची बाब बनली आहे. याचे कांही व्यापारी, नागरिकांना गांभीर्य राहिलेले दिसत नाही. सध्या शहरातील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत तरीही निष्काळजीपणाने वागणाऱ्यांची संख्या कमी होईना. एकीकडे महसुल व पोलिस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालून तळपत्या उन्हात कर्तव्य बजावत असताना शहरातील पोलिस ठाणे ते मुख्य चौक परिसरातील अनेक व्यापारी 'वरुन किर्तन, आतून तमाशा' याप्रमाणे आपली दुकाने छुप्या मार्गाने सुरु ठेवत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून शहरात फेरफटका मारत मागच्या दाराने व्यवसाय करुन संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या बाजारपेठेतील बी. डी. कोकडवार व त्यांचेसमोरील नंदकुमार चिद्रवार या दोन प्रतिष्ठित कापड दुकानावर अचानक धडक कारवाई करुन दोन्ही कापड दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोकला. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे, पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, नायब तहसीलदार परेश चौधरी, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, विजय बोधले, नितीन बुढे यांच्यासह पोलिस व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेड : आत्मविश्वास व डॉक्टरांच्या प्रयत्नातून 65 वर्षीय कोरोनातून बाहेर

दुसऱ्यांदा आढळून आल्यास गुन्हे दाखल करु :

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने खबरदारीचे उपाययोजना अंतर्गत आदर्श तत्वांसह सर्वत्र संचारबंदी लागू केली. तरीसुध्दा आदर्श मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे व्यापारी दुसऱ्यांदा संचारबंदीचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करु असे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे