कळमनुरी पालिकेच्या उद्यानाला आग लागुन तीन लाखाचे नुकसान

संजय कापसे
Wednesday, 10 February 2021

आग लागल्याचे समजताच उपस्थित मजूर व नागरिकांनी तातडीने हौदातील पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग फैलावली काही वेळाने अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. 

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला अचानकपणे आग लागून बुधवार (ता. १०) खेळण्याच्या साहित्याचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उद्यानामध्ये आग लागल्यानंतर शहरात उलटसुलट चर्चा होत असून पालिका प्रशासनाने या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे.

पालिकेकडून बंद अवस्थेत असलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था त्यानंतर उद्यानाच्या देखभालीकरिता नेमण्यात आलेल्या संस्थेचा करारनामा रद्द करणे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्यान सुरु करण्यासंदर्भात आंदोलन करावे अशी मागणी केली होती. मागील आठवडाभरापासून पालिकेचे बंद असलेले उद्यान चर्चेत आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून उद्यानामधील वाळलेल्या गवताचे साफसफाई करण्याकरिता मागील दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांना गवत कापण्यासाठी नेमणुका केल्या होत्या. दरम्यान, बुधवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान पालिकेचे स्वच्छता कर्मचारी याठिकाणी वाळलेले गवत कापण्याचे काम करत होते.

हेही वाचा - नांदेड : सात फेऱ्या घेण्याअगोदर गळ्यात पडली सरपंच पदाची माळ; आरळी येथील उच्चशिक्षित सरपंच तरुणीचा सोमवारी लग्न सोहळा

जेवणासाठी दुपारी हे कामगार एकत्र आले असताना इंदिरानगर बाजूने असणाऱ्या संरक्षण भिंतीच्या बाजूने वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आग तातडीने उद्यानाच्या मोकळ्या परिसरात पोहोचली. आग लागल्याचे समजताच उपस्थित मजूर व नागरिकांनी तातडीने हौदातील पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग फैलावली काही वेळाने अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. 

तोपर्यंत आगीत ट्रिपल हेब साईड, घसरगुंडी जळून खाक झाली. आग लागल्याचे वृत्त समजतात नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, आनंद दायमा, एन. पी. डाखोरे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीच्या नुकसानीची पाहणी करून यासंदर्भात अभियंता श्री. डाखोरे यांना उद्यानाला आग लागल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासंदर्भात मुख्याधिकार्‍यांनी सूचना केली. उद्यानाला लागलेल्या आगीत तीन लाख रुपये किमतीचे खेळणे जळून खाक झाले आहे. दरम्यान याप्रकरणी पालिकेच्या वाचमन व कर्मचाऱ्यांना मुख्याधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या पालिकेच्या बंद असलेल्या उद्यानाला अचानकपणे लागलेली आग हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या  सूत्राकडून देण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage of Rs 3 lakh due to fire in Kalamanuri Municipal Park hingoli news