धोक्याची घंटा...! ‘चित्रबलाक’ च्या प्रजातीमध्ये होतेय घट

राजाभाऊ नगरकर
रविवार, 8 डिसेंबर 2019

पक्षीमित्रांच्या पाहणीतून घट झाल्याचे समोर आले आहे. अधिवासाचा ऱ्हास आणि विनाश, वाढते प्रदुषण, पाणी वाहुन जाणे, प्रौढ पक्ष्यांच्या शिकारी आदींचा फटका बसत आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधील ‘चित्रबलाक’ हा पक्षी रहिवासी आहे.
 

जिंतूर (जि.परभणी) : पाणथळातील पाण्याचा उपसा, वाढते प्रदुषण या प्रमुख व इतर कारणांमुळे भारतात सर्वत्र मोठ्यासंख्येने आढळणारा ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) या पक्षाच्या प्रजातीमध्ये वेगाने घट होत आहे.  जिंतूर शहरातील दोन पक्षीमित्रांनी तालुक्यातील डोंगर भागातील लघु प्रकल्प, गावतलाव, व पाणवठ्यांना सातत्याने भेटी देत विविध प्रकारच्या पक्षांची पाहणी केली असता त्यांना ‘चित्रबलाक’ हा पक्षी फारच कमी प्रमाणात आढळून आला आहे.

 या पक्षाचे शास्त्रीय नाव ‘मायक्टेरिया ल्युकोसेफाला’ (Mycretia leucocephala) असून इंग्रजीत पेंटेड स्टॉर्क (Painted stork) म्हणतात. तर मराठीत रंगीत करकोचा किंवा चित्रबलाक या नावाने ओळखला जातो. हा पक्षी नद्या, तलाव,`धरणांचे जलाशय, पाणथळी आणि दलदलीच्या प्रदेशात दिसुन येतो. चोंच पूर्णपणे केशरी रंगाची, खांदयाजवळ आणि पंखावर गुलाबी पिसं हे या पक्ष्यांची वैशिष्ट्ये आहेत. मुख्यत्वे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधील चित्रबलाक रहिवासी असून स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. काड्या काटक्याच्या गबाळ खोलगट घरट्यात मादी तीन ते पाच अंडी घालते. रंगीत करकोचाच्या डोक्यावर सहसा पीस नसतात. मासेमारी किंवा बेडूकमारी करताना डोकं सतत पाण्यात बुडवावं लागतं. त्यामुळे त्याच्या डोक्याला पीसं म्हणून ते अनुकूलन झाले असावेत, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे. भारतात हा पक्षी बऱ्याच प्रमाणात आढळून येत असला तरी त्याचा समावेश  संकटसमीप वर्गात केला गेला आहे.

पक्षांच्या अधिवासाचे संवर्धन होणे गरजेचे
जिंतूर तालुक्यात कवडा, रायखेडा, निवळी, मैनापुरी, येनोली यासारख्या मोठ्या पाझर तलावासह अनेक छोट्या छोट्या तलावामध्ये हिवाळ्याच्या या दिवसात परदेशी पाहुण्यांसह स्थानिक पक्ष्यांचे सुद्धा नैसर्गिक अधिवास आहेत. यापैकी कवडा आणि निवळी हे तलाव पक्षांच्या अधिवासासाठी योग्य असून विविध प्रकारची जैवविविधता या ठिकाणी बघावयास मिळते. पक्षी सप्ताहानिमित्त कवडा, येनोली, या ठिकाणी पक्षीमित्रांनी निरीक्षण केले असता २१ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले. जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या मैनापुरी येथील तलाव परिसरात मोरांचे वास्तव्य मोठ्याप्रमाणात होते. परंतु, मानवाचा त्याठिकाणी वाढता वावर, मोरांची शिकार तसेच प्रशासनानेच रस्त्याच्या कामासाठी केलेले खोदकाम यामुळे या ठिकाणचे मोरांचे वास्तव्य कमी झाले असून मोर नाहीसे होत आहेत. अशा अधिवासांचे संवर्धन होण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

‘चित्रबलाक ’ ला भेडसावणारी संकटे...

अधिवासाचा ऱ्हास आणि विनाश, वाढते प्रदुषण, पाणी वाहुन जाणे, प्रौढ पक्ष्यांच्या शिकारी, सारंगा गारामधील अंडी, पिल्ले पळवणे तसेच किटकनाशकांमुळे होणारी विषबाधा यांचे वाढते प्रमाण हे चिंतेचे विषय आहेत. शिवाय मानवी हस्तक्षेप ही प्रमुख संकटे आहेत. पाणथळ जागांमधील पाण्याचा उपसा आणि प्रदुषण या कारणामुळे या प्रजातीच्या संख्येत वेगाने घट होत आहे. अशी खंत पक्षीमित्र विजय ढाकणेअनिल उरटवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The danger bell ...! The decline in species of 'Chitrabalak'