esakal | गटबाजी एकविशीतही समिकरण कायम; काय आहे बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचा इतिहास
sakal

बोलून बातमी शोधा

Datta Deshmukh writes Article on Beed Distric NCP

- स्थापना काळातले कोणी भाजपात कोणी सेनेत
- आताच्या राष्ट्रवादीतले भाजपचे वा जाऊन आलेले
- राष्ट्रवादीकडून लोकसभा लढविलेले सगळेच भाजपमध्ये
- मतदारसंघाची सिमारेषेचे सुत्रही कायम

गटबाजी एकविशीतही समिकरण कायम; काय आहे बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचा इतिहास

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : एका कपडे धुण्याच्या सोड्याच्या जाहीरातीत ‘दाग अच्छे है’ असे स्लोगन आहे. तसेच काहीसे राष्ट्रवादीच्या वाटचालीवर प्रकाश टाकल्यानंतर दिसून येते. स्थापनेनंतर २१ वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि गटबाजी हे समिकरण कायम राहीले आहे. पक्षाच्या नेत्यांना ही गटबाजी संपविता आली नाही कि वरिष्ठांनाच ती हवी याचे कोडे पक्षनिष्ठा असणाऱ्यांना तरी अद्याप सुटले नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थापना काळातील बहुतांश नेते आता बाहेर गेले असून राष्ट्रवादीत सध्या असलेले बहुतेक भाजपातून किंवा भाजपला एकदा वळसा घालून आलेले आहेत. त्यामुळे निष्ठा व राष्ट्रवादी तसा फारसा काही संबंध नसल्याचेही दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पक्षाने जनमाणसात पाय रोवण्यापेक्षा कायम एखाद्या सरदाराला बळ दिले. त्यामुळे त्याच्या पक्षांतरानंतर त्या भागात पक्ष कायम दुबळा राहीला. जिल्ह्याच्या नेत्याऐवजी मतदार संघापुरती मर्यादा पक्षाच्या स्थापना काळात दिवंगत केशरबाई क्षीरसागर, दिवंगत डॉ. विमलताई मुंदडा, विनायक मेटे, बाजीराव जगताप, दरेकर अशा मंडळींनी जेष्ठ नेते शरद पवारांची साथ दिली. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यशही मिळाले. पुढेही तसेच कमी अधिक प्रमाणात मिळत गेले. जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतही पक्षाची ताकद कायम असते. पण, या गटबाजीमुळे अनेकदा पक्षाला यशापासून दुर रहावे लागते. मात्र, अनेकदा शक्य असलेल्या गटबाजीवर पक्षाकडूनच तोडगा निघत नाही. त्यामुळे पक्षालाच ही गटबाजी हवी असते का, असे कोडे आहे. आजही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. 

दरम्यान, स्थापना काळातले जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत आहेत. तर, मुंदडा व जगताप भाजपात आहेत. सध्या पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे व आमदार प्रकाश सोळंके तिघेही भाजपातून आलेले. तर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासह जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनीही भाजपला एकदा वळसा घातलेलाच आहे. अपवाद संदीप क्षीरसागर यांचा असून पक्षस्थापनेवेळी राजकीय जन्म नसला तरी त्यांनी अद्याप तरी भाजपची पायरी शिवलेली नाही. त्यामुळे निष्ठा व राष्ट्रवादी आणि पद असे समिकरणही कधी मांडता आलेले नाही. पक्षाने या २१ वर्षांत लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या. पहिली निवडणुक लढविणोर राधाकृष्ण होके, पक्षाकडून एकमेव खासदार म्हणून विजयी होण्याचा विक्रम करणारे जयसिंग गायकवाड, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात निवडणुक लढविणारे रमेश आडसकर व सुरेश धस असे चौघांनीही राष्ट्रवादीला ‘रामराम’ ठोकला हे विशेष. 

लोकसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय आणि पुढे सहाच महिन्यांनी राष्ट्रवादीचा विजय ही राष्ट्रवादी नेत्यांची भाजपसोबतची अंधरुनी हातमिळवणीही अनेक निवडणुकांत स्पष्ट झाली. पण, नेतृत्वाने त्यावरही कधी तोडगा काढला नाही हे विशेष. यावेळी वा मागच्या वेळी जरी मोदी लाट असली तरी पुर्वी मात्र हेच घडायचे. पक्षाच्या स्थापनेपासून जिल्ह्याचा एक नेता हे सुत्र मोडीत निघाले. त्यामुळे शक्यतो विजयसिंह पाटणकर, दिग्वीजय खानविलकर, बबनराव पाचपुते अशी बाहेरची मंडळी पालकमंत्री म्हणून लादून पक्षानेच कायम जिल्ह्यातील नेत्यांना जखडबंद करुन ठेवले.


दिवंगत विमलताई मुंदडा, जयदत्त क्षीरसागर व आता धनंजय मुंडे या जिल्ह्यातील नेत्यांना जरी पालकमंत्रीपद दिले असले. तरी, अधिकार मात्र मतदार संघापुरते असे अलिखित नियम करुन ठेवलेला आहे. म्हणूनच आजही काही समित्यांच्या नेमणूका झाल्या असल्या तरी त्या फक्त परळी मतदार संघापुरत्याच झाल्या यावरुनच हे अधोरेखीत होते. कमी अधिक पाहीले तर मग प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्या थेट नेत्यांकडे सुरु झालेल्या तक्रारी असतील. पक्षात स्थानिक पातळीवर कुरबुरी घडू द्यायच्या आणि मग निर्णयासाठी पवारांकडे जायचे अशी सोयच करुन ठेवलेली असते. तसे, या २१ वर्षांत चौथ्यांदा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे अगदी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वाटपाधिकार सोडता बाकीच्यांना खुश ठेवण्याची कला अजित पवारांनी चांगली जोपासलेली आहे.   

पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जड वाटणाऱ्या नेत्यांचे पक्षनेत्यांकडूनच पराभव घडवूण आणणे वा पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी भाजपशी हातमिळवणी हे देखील नवे नाही. उदाहरण द्यायचे तर जयदत्त क्षीरसागर यांचा चौसाळातून झालेला पराभव असेल वा दिवंगत मुंडेंच्या विजयासाठी अख्ख्या राष्ट्रवादीने रमेश आडसकरांची सोडलेली साथ असेल किंवा अशोक डकांसाख्याला विरोधात घालून प्रकाश सोळंके यांचा घडविलेला पराभव असेल. 

स्थानिक स्वराज्य संस्थेत जरी कोणी पक्षाच्या चिन्हावर निवडुण आला तरी तो गटाचा होतो आणि त्यावरच गणित ठरते हेच पक्षातील गटबाजी सांगण्यासाठी पुरेसे आहे. तशी या पक्षात निष्ठा व पद असेही गणित कधी जुळले नाही. रात्रीतून येऊन उमेदवारी आणि कधी परिषद मिळते. संघटनेतले वा एखादे संविधानिक पद देतानाही त्याच्यामागे मतांचा गठ्ठा किती याचेही गणित फारसे तपासण्याची पद्धत या २१ वर्षांत घडली नाही. सहाजिकच आता २१ पूर्ण करत असल्याने ऐन तारुण्यात पक्ष आला आहे. त्यामुळे पक्षाची असलेली ताकद भविष्यात तरी एका गठ्ठ्यात एकत्र करण्याचे नवे समिकरण तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.