आजही भाऊबीजेच्या दिवशी गायीच्या शेणापासून पाच पांडव-गायवाडा साकारण्याची परंपरा आहे सुरु

जगदीश जोगदंड
Tuesday, 17 November 2020

गायीच्या शेणापासून पाच पांडव आणि गायवाडा भाऊबीजेच्या दिवशी सकाळी सकाळी घराच्या अंगणात साकारण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे.

पूर्णा (परभणी) : गायीच्या शेणापासून पाच पांडव आणि गायवाडा भाऊबीजेच्या दिवशी सकाळी सकाळी घराच्या अंगणात साकारण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. राज्यातील प्रत्येक कुणब्याच्या घरासमोर ही कलाकृती साकारल्या जातेपिंपळा लोखंडे येथील पार्वती रावसाहेब लोखंडे आणि मंजुषा कुसळे यांनी आपल्या अंगणात तो साकारला .

ईडा-पिडा टळू दे, बळीचे राज्य येवू दे चा जप करत बहीण भावाला औक्षण करते. 'बळीराजा'च्या स्वप्नातलं स्वराज्य यावं, असे मनोमन चिंतते. काळ्या रानात राबराब राबणारे कष्टकरी माय-बाप, भाऊ भावजाई हेच तीच्यासाठी भगवंत असतात. गाय-वाडा पाच पांडव घातल्यानंतर त्यांची हळदीकुंकवाने मनोभावे पूजा केली जाते. शेणाच्या गोवऱ्याचा जाळ करून त्यावर कुंभाराने घडवलेले मडके ठेवून त्याच ठिकाणी शेवया शिजवून त्याची खीर केली जाते.

दूध, तुप व साखर टाकून बनविण्यात आलेल्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. मडक्यात शिजवलेल्या या शेवयांच्या खिरीचा प्रसाद वाटला जातो. त्याची चव अवर्णनीय असते. शहरी झगमगाटात व विकत आणलेल्या रेडीमेड मिठाईच्या युगात मात्र अस्सल ग्रामीण दिवाळ सणाची मजा आजही खेडोपाडी पाहावयास मिळते.

संपादन- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the day of Bhau Bij there is a tradition in Maharashtra to make five Pandavas and Gaiwadas from dung in the yard of the house