औरंगाबाद जिल्ह्यात डेंगीचा कहर

मधुकर कांबळे 
Saturday, 19 October 2019

स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या आणि दिवसा चावणाऱ्या एडिस ईजिप्टाय विषाणुबाधित मादीने घेतलेल्या चाव्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात डेंगीची लागण झालेले 64 रुग्ण आढळले; तर संशयित रुग्णांची संख्या 247 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. डेंगी तापावर निश्‍चित असे औषधोपचार नसल्याने प्रत्येक नागरिकांनी डास उत्पत्ती होऊ नये यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे हे महत्त्वाचे आहे. याशिवाय रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पती गुणकारी असल्याचे वनौषधी तज्ज्ञांनी मत व्यक्‍त केले आहे. 

औरंगाबाद- स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या आणि दिवसा चावणाऱ्या एडिस ईजिप्टाय विषाणुबाधित मादीने घेतलेल्या चाव्यामुळे जिल्ह्यात डेंगीची लागण झालेले 64 रुग्ण आढळले; तर संशयित रुग्णांची संख्या 247 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. डेंगी तापावर निश्‍चित असे औषधोपचार नसल्याने प्रत्येक नागरिकांनी डास उत्पत्ती होऊ नये यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे हे महत्त्वाचे आहे. याशिवाय रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पती गुणकारी असल्याचे वनौषधी तज्ज्ञांनी मत व्यक्‍त केले आहे. 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एडिस ईजिप्टाय डासांपासून पसरणारा हा संसर्गजन्य आजार असून, मादी डासांपासून याची लागण होते. डेंगीची साथ पसरू नये, डासांचे निर्मूलन व्हावे यासाठी ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी तसेच ग्रामसभांमधून 15-20 मिनिटे डेंगीविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय एक दिवस कोरडा पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची कोणालाही याची लागण होऊ शकते. विशेषत: लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असतो. हे डास सहसा दिवसा चावतात. घर व परिसरातील साठलेल्या पाण्यात विशेषत: स्वच्छ पाण्यात डेंगीच्या लारवा (अळ्या) होऊन त्यापासून डास होतात. यासाठी आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी, पाण्याची भांडी नीट झाकून ठेवावी. घराचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. परिसरात व छतावर वापरात नसलेले साहित्य टाकून अस्वच्छता करू, नये याविषयी गावोगावी जागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले. 

ही आहेत लक्षणे 

अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळळ्यांच्या मागे दुखणे ही लक्षणे दिसतात. रक्‍तस्रावित डेंगी ताप हा त्याची गंभीर अवस्था आहे. याची सुरवात तीव्र तापाने होते आणि त्याबरोबरच डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंगी तापासारखी असतात व क्‍वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्‍तस्रावित डेंगी तापाचे निदान हात, पाय, चेहरा मानेवर आलेल्या पुरळांवरून केली जाते. नाकातून, हिरड्यातून रक्‍तस्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात. 

वनस्पती वाढवतील रोगप्रतिकारशक्‍ती 

डेंगीची लागण झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्‍ती कमी होत असल्याने त्यावर अन्य रोगांचे विषाणू प्रभावी ठरतात आणि इतर आजारांना सामोरे जावे लागते. याविषयी लॉडर्स वनौषधी उद्यानाचे डॉ. डी. ए. सावंत म्हणाले, ""डेंगीच्या रुग्णांना रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ऍलिओपॅथीतील उपचारांबरोबर औषधी वनस्पतींचे उपचारही अतिशय फायदेशीर ठरू शकतात. आपल्या आजूबाजूला औषधी वनस्पती असतात; मात्र त्यांचे उपयोग आपण विसरल्याने त्यांचा वापर करत नाही. कडुनिंबाची पाच ते आठ ताजी पाने स्वच्छ धुऊन त्याचा रस करून पिल्याने व्हायरल इम्युनिटी वाढते. पपईत फिनॉलिक घटक, पौष्टिक अन्नघटक व ऍन्टी ऑक्‍सिडंट असल्याने रोगप्रतिकारशक्‍ती वाढीसाठी खूप चांगला फायदा होते. यासाठी पपईचे पान मोठे असेल तर अर्धे, लहान व मध्यम असेल तर एका पानाचा एक ग्लास पाण्यात रस काढून सकाळ संध्याकाळ पाच ते सहा दिवस पिल्यास चांगला फायदा होतो. याशिवाय पिकलेल्या पपईच्या फळाचा रस दिल्यासदेखील फायदा होतो. रोज कमीत-कमी 50 ग्रॅम डाळिंब दाने खाल्याने किंवा त्याच्या पानाचा रस प्यावा. याशिवाय गुळवेल, आडूळसाची पाने, तुळशीची पाने डेंगीमध्ये उपयोगी आहेत. या औषधीवनस्पतींची मात्रा औषधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करून डेंगीपासून बचाव करता येऊ शकतो. 
 
औरंगाबाद जिल्ह्यात आकडे बोलतात 

ग्रामीण : डेंगी रुग्ण : 15, संशयित रुग्ण : 59 
शहरी : डेंगी रुग्ण : 04, संशयित रुग्ण : 13 
महापालिका क्षेत्र : डेंगी रुग्ण 45, संशयित रुग्ण : 175 
एकूण रुग्णसंख्या : 64, संशयित रुग्णसंख्या : 247 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: day biting female mosquitoes terror  :  news of dengue