शिवसेनेला बसणार बंडखोरीचा फटका

शिवसेनेतील बंडाला मराठवाड्यातूनच सुरुवात झाली असे म्हणायला जागा आहे.
Paithan Shivsainik
Paithan ShivsainikSakal
Summary

शिवसेनेतील बंडाला मराठवाड्यातूनच सुरुवात झाली असे म्हणायला जागा आहे.

शिवसेनेतील बंडाला मराठवाड्यातूनच सुरुवात झाली असे म्हणायला जागा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिली नावे चर्चेत आली त्यात मराठवाड्यातील मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, ज्ञानराज चौगुले, प्रा. तानाजी सावंत व बालाजी कल्याणकर या आठ आमदारांचा समावेश होता. किंबहुना ठाकरे सरकारमधील हे मंत्री व आमदारांच्या सांगण्यावरूनच व त्यांनी दिलेल्या आश्वासनावरच शिंदे यांनी एवढे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र या बंडाने येथील शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का बसला. अजूनही सर्वसामान्य शिवसैनिकांना या बंडात कुणाची बाजू खरी व कुणाची खोटी हे ठरवता येईनासे झाले आहे.

बंडाचे शिलेदार

या बंडाचे पहिले शिलेदार होते पैठणचे संदीपान भुमरे. साखर कारखान्यावर स्लिपबॉय राहिलेल्या भुमरे यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकाला शिवसेनेने पंचायत समिती सभापती, पुढे पाच वेळा आमदार व आता थेट कॅबिनेट मंत्रीही केले. आधी अपक्ष व नंतर कॉँग्रेसमार्गे शिवसेना असा विचित्र राजकीय प्रवास केलेल्या सिल्लोडच्या अब्दुल सत्तार यांची स्थानिक राजकारणावर जबरदस्त पकड आहे. ती इतकी आहे की सिल्लोड तालुक्यात ‘सत्तार हाच पक्ष’, असे विनोदाने म्हटले जाते. सरपंच, नगराध्यक्ष ते चार वेळा आमदार अशी मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे तीन टर्मपासून शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचाही रिक्षाचालक ते आमदार असा प्रवास आहे. त्यांनी परवा मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातून बंडामागची खदखद खऱ्या अर्थाने समोर आणली. आ. प्रदीप जयस्वाल यांचीही ओळख अशीच. अगदी कट्टर शिवसैनिक, पहिला तरुण महापौर, खासदार, तीनवेळा आमदार, अनेक पदांवर त्यांनी आपली छाप उमटविली. एकदा बंड केले. आताचे त्यांचे हे दुसरे बंड. परंड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत दोन वेळा आमदार (एकदा विधान परिषद) राहिले. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले ही तीन वेळा आमदार राहिले. तर वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरनारे व बालाजी कल्याणकर हे पहिल्यांदाच निवडून आले आणि बंडाला सामोरे गेले.

डॅमेज कंट्रोल नाही

या सर्वांच्या मतदारसंघात बंडानंतर पहिल्या दिवशी काहीच झाले नाही. मात्र शिवसेनेने सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी निदर्शने, बंडखोरांच्या कार्यालयांवर हल्ले व फलकांना काळे फासणारा कार्यक्रम आखल्यानंतर बंडखोरांनीही आपल्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शने करत चोख प्रत्युत्तर देणे सुरू केले. अनेक स्थानिक नेत्यांनी भूमिकाच घेतली नाही. काय होतेय हे समजून घेणे व आपापली मते तयार करणे एवढेच त्यांच्या हातात उरले होते. संघटनेकडून काहीही कळविण्यात येत नव्हते किंवा स्थानिक पातळीवर डॅमेज कंट्रोलची कसलीही यंत्रणा दिसून येत नव्हती. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील शिवसेना पक्ष अक्षरशः गुंडाळून आपल्या मागे ठेवला. औरंगाबादेत मात्र चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी निदर्शने करत बंडखोरांना इशारा दिला. सत्तातरानंतर तिकडे पैठणमध्येही मंत्री भुमरे यांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या जवळच्या समर्थकांशिवाय पक्षाचे पदाधिकारी तिकडे फिरकले नाहीत. तिकडे तानाजी सावंतांनीही परंड्यात आपल्या समर्थकांना निदर्शने करण्यास सांगितले. उस्मानाबादेत मात्र त्यांच्या विरोधात निदर्शने झाली. नांदेडला आ.कल्याणकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा शिवसैनिकांनी काढली. उमरग्यातही चौगुले यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांविरोधात बंडखोर आमदार समर्थकांनी केलेली आंदोलने ही स्पॉन्सर्ड आंदोलने होती, हे लक्षात घ्यावे लागेल. काही ठिकाणी शिवसेनेतील पदाधिकारी फुटले आहेत. मात्र ते नेमके कोण हे अजून सिद्ध झालेले नाही.

राजकीय कारकीर्द शेवटाकडे?

हे बंड यशस्वी झाले तर जयस्वालांविरोधात मध्य मतदारसंघात शिवसेनेकडून किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले, पश्चिममधून शिरसाट यांच्याविरोधात ऋषीकेश खैरे, बाळासाहेब गायकवाड आदी नावे चर्चेत आहेत. पैठण, सिल्लोड, नांदेड, परांडा, उमरगा या मतदारसंघात त्यावेळच्या स्थानिक परिस्थितीवर तेथील उमेदवार व लढती अवलंबून असतील. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे या बंड केलेल्यांपैकी किमान पाचजणांची राजकीय कारकीर्द शेवटाकडे निघाली आहे. तिथे त्यांनी आपापले राजकीय पर्याय आधीच निवडून ठेवलेले आहेत. सत्तार व शिरसाट यांनी त्यांच्या मुलांना तयार करून ठेवले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता नाही. प्रदीप जयस्वाल यांचीही तशीच स्थिती आहे. त्यांचे आजारपण व इतर कारणामुळे ते पक्षात आधीच निष्क्रीय बनले आहेत. त्यांनी बंडच का केले ते त्यांच्या समर्थकांनाही समजायला मार्ग नाही.

कार्यकर्त्यावरच भिस्त

औरंगाबाद या महत्त्वाच्या शहरात शिवसेनेला बंडखोरांनी दिलेला धक्का जबर मानला जातो. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी याच महिन्यात या शहरात जाहीर सभा घेत संघटनेत जान फुंकण्याचा प्रयत्न याच बंडखोर आमदारांच्या साक्षीने घेतला होता. याप्रकारची गटबाजी ही शिवसेनेत आधीपासून दिसून येत होती. हे आमदार महोदय पक्षाला व नवनेतृत्वाला डावलण्याची भाषा आधीपासून करत होते. आता ते या बंडाच्या रूपाने समोर आले इतकेच. या बंडामुळे आगामी मनपा निवडणुकीत आधीच टपून बसलेल्या भाजपला याचा सर्वाधिक फायदा होईल असे मानले जाते. तसेच शहरातील विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची ताकद या बंडखोरीमुळे क्षीण होईल, असे मानले जाते. मात्र जसे सांगितले जाते की हा पक्ष सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बळावर उभा राहिला आहे. हे अनेकवेळा सिद्धही झाले आहे. त्या जादूवर विश्वास ठेवत आज अस्तित्वात असलेली शिवसेना वाटचाल करत आहे.

सद्यःस्थिती

  • मराठवाड्यात शिवसेना दिशाहीन

  • बंडाला मुख्य रसद मराठवाड्यातूनच

  • काही ठिकाणी पदाधिकारीही फुटले

  • गटबाजीची माहिती असून उपाययोजनाच नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com